Sonapur Deshpande Village. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur News : भाजप नेत्याच्या गावात ‘धनदांडग्यांना’ घरकुल; गरीबांना केवळ भूल

Sonapur Deshpande Village : गरजूंना डावलल्याने ग्रामस्थांमध्ये संताप. निकषांशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी.

संदीप रायपूरे

Chandrapur News : गावागावातील अनेक गरीबांना हक्काचे घर नसते. रोजीरोटी कमावत ते कसेबसे कुटुंबाचा रहाटगाडग चालवितात. समाजातील अशा गरजूंना हक्काचे घरकुल असावे यासाठी पंतप्रधान आवाज योजना सुरू करण्यात आली आहे. पण या योजनांचा लाभ गरीबांना कमी आणि सत्ताधाऱ्यांना जास्त मिळत असल्याचे दिसत आहे. असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील सोनापूर देशपांडे या गावात समोर आला आहे. भाजप नेत्याच्या या गावात गरजूंना बाजूला सारत ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्षांना घरकुलाचा लाभ मिळाल्याने गरजू नागरिक आता कमालीचे संतापले आहेत. त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी करीत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

तेलंगणा राज्याच्या सिमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोनापूर देशपांडे गावात भाजप नेते दीपक सातपुते यांची सत्ता आहे. त्यांच्या पत्नी जया सातपुते या ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. 2023-24 या वर्षाकरीता गावात एकूण 23 घरकुल मंजूर करण्यात आलेत. गावातील अनेक नागरिकांनी ही यादी पाहिली आणि त्यांच्या संतापाचा बांध फुटला. 23 घरकुलांपैकी तब्बल नऊ घरकुल हे गावातील धनदांडग्यांना देण्यात आले. यात ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व आशा वर्कर यांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घरकुलासाठी गावातील अनेक गरीब परिवारांनी अर्ज केला होता. मात्र त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आलेत. गरीबांना घरकुलाची आवश्यकता असताना धनदांडग्यांना घरकुल योजना मंजूर झाल्याने अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गावात होत असलेला हा अन्याय सहन करायचा नाही, या भावनेने आता नागरिकांनी यासंदर्भातील तक्रार गोंडपिपरी पंचायत समितीकडे दाखल केली आहे. तक्रारीतून त्यांनी आपल्यावर अन्याय झाला असून यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यासची मागणी केली आहे. याशिवाय गरजूंना न्याय मिळवून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दीपक सातपुते हे भाजपचे वजनदार नेते आहेत. ते गोंडपिपरी पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. गावातील नागरिकांसाठी आपल्या जिवाची बाजी लावणारा नेता अशी सातपुतेंची ओळख आहे. सातपुते हे भाजपच्या स्थानिक वरिष्ठ पातळीवरील नेते आहेत. सोनापूर देशपांडे गावात अनेक वर्षांपासून त्यांची एकहाती सत्ता आहे. सध्या दीपक सातपुते यांच्या पत्नी जया सातपुते या सरपंच आहेत. अशा स्थितीत गावातील अनेक गरींबाना घरकूल न मिळाल्याने आता त्यांच्यात कमालीचा संताप पसरला आहे. गावातील संतापलेल्या नागरिकांनी पंचायत समिती प्रशासनाकडे याबाबतची तक्रार दाखल केली आहे. गरीबांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांची चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी तक्रारीतून त्यांनी केली आहे. तक्रारीत गावातील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT