Vinod Patole and Dr. Salve.
Vinod Patole and Dr. Salve. Sarkarnama
विदर्भ

Vinod Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भावासह ५ जणांवर गुन्हे दाखल !

सरकारनामा ब्यूरो

A case has been registered against Nana Patole's elder brother Vinod Patole and 5 persons : चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संचालक डॉ. प्रमोद साळवे यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे भाऊ विनोद पटोले यांच्यासह ५ जणांवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धानोरा तालुक्यातील चातगावनजीकच्या कटेझरी येथे डॉ. प्रमोद साळवे यांची बहीण अलका रामने यांच्या मालकीची राइस मिल आहे. २०२० मध्ये या राइस मिलच्या विक्रीचा तोंडी सौदा विनोद पटोले यांच्याशी झाला होता. विक्रीपोटी पटोले यांनी डॉ. साळवे यांना ५१ लाख रुपये द्यायचे होते. परंतु पटोले यांनी २०२१ पर्यंत केवळ २० लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम देण्याविषयी त्यांनी कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही, असा आरोप साळवेंनी केला.

डॉ. साळवे यांनी विनोद पटोले यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी राइस मिल विक्रीची जाहिरात दिली. पुढे ३ मार्च २०२३ रोजी डॉ. साळवे हे आपल्या वाहनाने चातगाव येथून गडचिरोलीकडे (Gadchiroli) येत असताना बोदली गावाजवळ विनोद पटोले आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी आपले वाहन अडवून शिवीगाळ करीत धमकावले. त्यांच्यासोबतच्या अन्य चार जणांनीही धमकावले, अशी तक्रार डॉ. प्रमोद साळवे यांनी पोलिसांत केली होती.

डॉ. प्रमोद साळवे यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी सोमवारी रात्री विनोद पटोले, सुमोत कोठारी, छगन शेडमाके, दामदेव मंडलवार व अन्य एका व्यक्तीवर भादंवि कलम ३४१, १४३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. डॉ. प्रमोद साळवे यांनी दिलेल्या नोटीसमध्ये पैसे दिल्याचे त्यांनी स्वीकारले आहे. अशा दोन नोटीस मी विनोद पटोले यांना पाठविली होती. पण त्यांनी दुसऱ्या वेळीही नोटीस स्वीकारली नाही.

विनोद पटोले यांच्यासह मंडलवार नावाचे निवृत्त पोलिस अधिकारी आणि इतर चार ते पाच जणांनी रस्त्यात अडवून धमकी दिली. ‘राईस मिल हमारे नाम से लीख दे, नही तो तेरेको मार डालेंगे, राईस मिल जला देंगे, राइस मिल के साथ इसको भी जला देंगे’ अशा शब्दांत त्या लोकांनी धमकी दिल्याचे डॉ. प्रमोद साळवे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी मला जबरदस्ती त्यांच्या वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून मी आपली सुटका करवून घेतली, असेही डॉ. साळवे यांनी सांगितले.

यासंदर्भात विनोद पटोले यांच्याशी संपर्क साधला असता, डॉ. साळवे यांच्याकडून आम्ही राईस मिल आणि जागा विकत घेतली होती. त्याचा करारही झाला होता. त्यांना पैसे चेकद्वारे दिले होते. त्यांनी पोलिसात (Police) जी काही तक्रार केली आहे, ती खोटी आहे. त्याविरोधात आम्ही आता उच्च न्यायालयाचे (High Court) दार ठोठावणार आहो, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT