Mutton Curry
Mutton Curry  Sarkarnama
विदर्भ

‘एकच प्याला’च्या नादात मटण गेले चोरी, मतदारांनी अंड्यांवर भागवली भूक...

संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) ः गोंडपिपरीत सध्या नगरपंचायतीच्या तीन प्रभागांत निवडणुकीची (Election) रणधुमाळी सुरू आहे. यांपैकी एका प्रभागातील उमेदवाराने मतदारांना पार्टीसाठी बोलावले. त्यासाठी ७ किलो मटण (Mutton) आणले. बनवण्यासाठी सर्व साहित्याची जुळवाजुळव झाली. अन् ‘एकच प्याला’ साठी सर्व जण आडोशाला गेले. मद्य जसजसा रंग दाखवू लागला, तशा गप्पा रंगल्या. तेवढ्यात चोरट्यांनी ७ किलो मटण लांबविले. अन् उमेदवारासह मतदारांना मटणाची भूक अंड्यांवर भागवावी लागली.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या गोंडपिपरीतील प्रभाग क्रमांक १५ च्या उमेदवाराने साधारणतः तीस लोकांसाठी सात किलो मटण घेतले. गावात विषय नको म्हणून आडबाजूला चिंचेच्या झाडाखाली पार्टीचे नियोजन ठरले. मटण तयार करण्यासाठी इतर साहित्य जमा करण्यात आले. मटणावर ताव मारण्यासाठी मतदार या ठिकाणी जमा झाले. जेवणापूर्वी मद्यपान करण्यासाठी ही मंडळी थोडीशी बाजूला गेली. पार्टीच्या ठिकाणी परतल्यानंतर उमेदवाराला धक्काच बसला. कारण सात किलो मटण चक्क गायब झाले होते. मतदारांना या प्रकाराची माहिती मिळाली अन् त्यांचा हिरमोड झाला. शेवटी मटणाची पार्टी अंड्यावर निभवावी लागली.

गोंडपिपरीत सध्या नगरपंचायतीच्या तीन प्रभागांत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातील प्रभाग क्रमांक १५मधील उमेदवारासोबत घडलेल्या या प्रकाराची रंजकदार चर्चा सुरू आहे. ते सात किलो मटण नेमके चोरले कुणी, याचा शोध उमेदवार घेत आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले. अन् या प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गासाठी उमेदवारी जाहीर झाली. तीन प्रभागांपैकी पंधरा क्रमांकांच्या प्रभागात कमालीची रस्सीखेच आहे. या प्रभागात एकूण पाच उमेदवार उभे आहेत. यांपैकी दोन सख्ख्या जावा प्रभागात आमनेसामने आहेत. संपत्ती लपविल्याच्या आरोपाने या प्रभागातील प्रकरण जिल्हा न्यायालयात पोहोचले होते. यामुळे या प्रभागातील निवडणुकीत कमालीची रंगत निर्माण झाली.

अशात या प्रभागातील एका उमेदवार पतीने मतदारांसाठी बकरा पार्टीचे आयोजन केले. गावात विषय व्हायला नको म्हणून गावालगत आडबाजूला चिंचेच्या झाडाखाली पार्टी ठरली. साधारणतः ३० मतदारासाठी सात किलो मटण घेण्यात आले. मटण बनविण्यासाठीचे संपूर्ण साहित्य नेण्यात आले. मतदारांना तिथे बोलावण्यात आले. पार्टीची सुरुवात म्हणून मद्यपानासाठी उमेदवार या मंडळीला घेऊन बाजूला गेला. मद्यपान झाले अन् मटण शिजविण्याची तयारी करण्याकरिता उमेदवार आला. अन् बघतो तर काय मटण गायब. चोरट्याने मटण लांबविले, हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. मग लगेच अंड्याची भाजी करण्यात आली.

मटणाची चोरी झाल्याची माहिती कळताच मतदारांत कमालीची अस्वस्थता पसरली. याठिकाणी या प्रकारावरून बरीच चर्चा झाली. आजूबाजूला मटणाची शोधाशोधही करण्यात आली. पण मटणाचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी मतदारांची समजूत काढीत उमेदवाराने मटणाची पार्टी अंड्यावर निभवली. गोंडपिपरीत घडलेल्या या प्रकाराची खमंग चर्चा सुरू आहे. आपले मटण नेमकी कुणी चोरले, याचा शोध आता उमेदवार घेत आहे. दरम्यान विरोधी उमेदवाराने माणूस पाठवून मटणाची चोरी करायला लावल्याची जोरदार चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT