नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपुरातील बरेच नेते पक्षाच्या प्रदेश कमिटीवर आहेत. त्यांपैकी काही राष्ट्रीय कमिटीवरसुद्धा आहेत. पण ही मंडळी प्रत्यक्षात काम करीत नाही, तर आपल्या ‘दुकानदाऱ्या’ करण्यापुरतेच दिसतात, अशा तक्रारी वरिष्ठांना मिळाल्या. त्यामुळे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नागपूर (Nagpur) गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. संघटना कशी मजबूत करावी, यासाठी त्यांनी भाजपचे उदाहरण दिले.
काल मंगळवारी संपर्कप्रमुख तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये पक्ष संघटना मजबूत कशी करावी, हे सांगताना वळसे पाटलांनी भाजपचे उदाहरण दिले. भाजपसाठी वेगवेगळ्या नावाने तब्बल ३३ संघटना काम करतात. संघटनांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष निवडणुकीत दिसत नाहीत. मात्र, भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पडद्यामागून काम करतात. काही सोयीचे आणि गैरसोयीचे राजकीय मुद्दे या संघटनांच्या माध्यमातून उपस्थित केले जातात. ‘भोंगे’ हा त्याचाच एक भाग आहे. हा मुद्दा आपल्या दृष्टीने चुकीचा आहे. मात्र, त्याचा फायदा भाजप आपल्या राजकीय सोयीसाठी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने एका प्रभागाची जबाबदारी घ्यावी आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणावे. कामचलाऊ धोरण यापुढे चालणार नाही, असा इशारा दिला. इच्छा असेल तर पदाधिकाऱ्यांनी निवडणूकसुद्धा लढवावी. पण आता कुठल्याही परिस्थितीत पक्ष वाढला पाहिजे, असे ते म्हणाले. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करायची की नाही, असा संभ्रम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या बैठकीत आघाडी आणि स्वबळ अशा दोन्ही बाजूंनी टोकाची मते व्यक्त करण्यात आली. त्यामुळे राज्यपातळीवर जो निर्णय होईल, त्यानुसार स्थानिक कार्यकर्त्यांना लढावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपूरमधील ग्राफ सातत्याने खाली जात आहे. आठ ते दहा नगरसेवकांवरून एका नगरसेवकावर संख्या येऊन ठेपली आहे. महापालिकेची मागील निवडणूक सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. काँग्रेससोबत आघाडीत असताना राष्ट्रवादीची संख्या समाधानकारक राहात होती. त्यामुळे यावेळी कुठल्याही परिस्थितीत आघाडी करावी आणि आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवावी, असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडले. राष्ट्रवादीचे अस्तित्व काही प्रमुख कार्यकर्त्यांवरच अवलंबून आहे. मात्र, तीन किंवा चारचा प्रभाग असल्यास संबंधित उमेदवारास पुरेशी मदत होत नाही. परिणामी मतांची टक्केवारी वाढल्याचे दिसत असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा होत नाही, अशीही मांडणी काहींनी केली.
दुसरीकडे महाविकास आघाडी केल्यास राष्ट्रवादीला दुय्यम भूमिकेतच राहावे लागेल. चार-पाच नगरसेवक कदाचित निवडून येतीलही. पण त्यामुळे पक्ष बळकट होणार नाही. घराघरांत पोहोचणार नाही. विशिष्ट वस्ती किंवा प्रभागापुरताच राष्ट्रवादी मर्यादित राहील. आपण सर्व प्रभागांत लढल्यास संपूर्ण शहरभर महापालिका निवडणूक आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी घराघरांत पोहोचेल. सर्वांना लढण्याची संधी मिळाल्याने इच्छुक कार्यकर्तेसुद्धा नाराज होणार नाहीत. बंडखोरीचीही भीती राहणार नाही. आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीची नेमकी ताकद किती आहे, हेसुद्धा दिसेल, असे मत मांडण्यात आले. संपर्कप्रमुखांनी दोन्ही बाजूंची मते ऐकून घेतली आणि महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठांवर सोपवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.