MP Sunil Mendhe
MP Sunil Mendhe Sarkarnama
विदर्भ

शुभेच्छा द्यायच्या आहेत, मग नोटबुक्स आणा; खासदार मेंढेंचा अनोखा वाढदिवस...

Abhijeet Ghormare

भंडारा : कुणाचाही वाढदिवस म्हटला की, आनंदाला उधाण आले असते. त्यातल्या त्यात एखाद्या बड्या नेत्याचा वाढदिवस म्हटला की, बडेजाव आलाच. मोठा उत्सव, भेटवस्तू, फुलांचा वर्षाव, शाल, श्रीफळ आणि ढिगाने पुष्पगुच्छ आणले जातात. पण भंडारा (Bhandara) -गोंदियाचे खासदार सुनील मेंढे (MP Sunil Mendhe) यांनी शुभेच्छांच्या स्वरूपात पुष्पगुच्छ व तत्सम इतर काही वस्तू न स्वीकारता फक्त नोटबुक्स स्वीकारले आणि अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करीत एक समाजहितकारी संदेश दिला.

खासदार मेंढे यांच्या या आवाहनाला त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि आप्तेष्टांनी भरभरून प्रतिसाद दिला. शुभेच्छा देणाऱ्यांकडून बुके नव्हे तर नोटबुक स्वीकारले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीदिनीच वाढदिवस असल्याने खासदार सुनील मेंढे यांनी महामानवाला अनोखे अभिवादन केले. आता गोळा झालेल्या हजारो नोटबुकचे वितरण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील होतकरू विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विकासाचा मार्ग सुकर करणाऱ्या खासदार सुनील मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता.

भंडारा शहरात बहिरंगेश्वर मंदिरात रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदान केले. त्रिमूर्ती चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील वृद्धाश्रमाला भेट देऊन खासदारांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला. व्यसनमुक्ती केंद्राला भेट देत तेथील लोकांसोबत खासदारांनी केक कापून आनंद वाटला.

संध्याकाळी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मान्यवर मंडळी, कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी स्नेहमीलनाचा कार्यक्रम घेतला गेला. पुष्पगुच्छ न देता नोटबुक भेट द्या, असे आवाहन खासदार सुनील मेंढे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत आलेल्या प्रत्येकाने नोटबुक भेट दिले. त्यामुळे हजारो नोटबुक गोळा झाले आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना ते नोटबुक वितरण केले जाणार आहे. त्यामुळे खासदारांना मिळालेली ही भेट अनेक गरजूंची गरज भागविणारी ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT