गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील धोंडराज पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एक पोलिस जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिस (Police) दलाच्या सी-६० पथकाचे पोलिस जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस जवानांवर अचानक अंदाधुंद गोळीबार केला पोलिसांनीही नक्षल्यांना (Naxal) चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात एक पोलिस जवान जखमी झाला असून जवानाला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी काही नक्षल्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
घटनास्थळावरून नक्षल्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात पोलिस जवानांना यश आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक वाढविण्यात आले असून सर्चींग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले. यासंदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख यांना विचारले असता अभियान अद्याप सुरूच असून संपूर्ण माहिती मिळताच कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी गडचिरोली जिह्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सी-६० दलातील जवानांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले होते. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून जनतेने नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही त्यांनी सांगितले होते. ते गेल्यानंतर तीनच दिवसांनंतर ही चकमक उडाली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीने नुकत्याच मरण पावलेल्या जहाल नक्षली नेता नर्मदाक्का हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ २५ एप्रिलला ‘दंडकारण्य बंद’चे आवाहन केले होते. त्याचा परिणाम भामरागड तालुक्यात दिसून आला. येथे पुलाच्या कामावरील साहित्याची नक्षल्यांनी जाळपोळ केली होती. नक्षल्यांच्या बंदच्या आवाहनामुळे जिल्ह्यात फारसा परिणाम झाला नसला तरी भामरागड तालुक्यात त्यांनी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि आज त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही त्यांना तोख प्रत्युत्तर दिले. आताही चकमक सुरू असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.