Shiv Sena  Sarkarnama
विदर्भ

Shivsena : शिवसेना पदाधिकाऱ्याला ड्रग्जसह रंगेहाथ अटक; 10 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

Warora Police MD Drug Seizure: वरोरा पोलिसांनी एमडी ड्रग्जविरोधात कारवाई करत शिवसेनेच्या वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्षाला अटक केली. आरोपीकडून ड्रग्ज, स्कॉर्पिओ आणि मोबाईलसह १०.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सरकारनामा ब्युरो

Drugs Case : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत एका इसमाकडून एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जसह अलिशान कार आणि मोबाईल असा एकूण १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दीक (वय ३६) याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो शिवसेनेच्या वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

वरोरा येथील पद्मालय नगर भागात एका इसमाने आपल्या आलिशान वाहनात अवैधरित्या विक्रीसाठी एमडी ड्रग्ज बाळगल्याची खात्रीलायक गुप्त माहिती वरोरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने चक्र फिरवून परिसरात दबा धरून सापळा रचला. संशयित वाहन येताच पोलिसांनी त्यावर छापा टाकला आणि आरोपी गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दीकी याला जागीच ताब्यात घेतले.

आलिशान स्कॉर्पिओतून ड्रग्जची तस्करी

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील एमएच-३४ सीएच-५७५७ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाची सखोल झडती घेतली. यावेळी पोलिसांना गाडीत लपवून ठेवलेल्या चार वेगवेगळ्या झिपलॉक प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. या पिशव्यांची तपासणी केली असता, त्यात पांढऱ्या भुरकट रंगाचे ५.७८० ग्रॅम वजनाचे एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त करण्यात आले.

१० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या या हाय-प्रोफाईल ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे २७ हजार रुपये आहे. याशिवाय ड्रग्ज तस्करीसाठी वापरण्यात आलेली १० लाख रुपयांची स्कॉर्पिओ कार आणि गुन्ह्यात वापरलेला १० हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल

या गंभीर अमली पदार्थ तस्करी प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) कलम ८ (क) आणि २१ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. हा साठा त्याने कोठून आणला होता आणि तो चंद्रपूर जिल्ह्यात आणखी कोणाला पुरवणार होता, याचा पुढील तपास वरोरा पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT