Akola Municipal Corporation
Akola Municipal Corporation sarkarnama
विदर्भ

फडणवीस साहेब एक आक्रोश मोर्चा अकोल्यातील पाण्यासाठीही होऊन जाऊ द्या!

मनोज भिवगडे

अकोला : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात औरंगाबाद येथील पाण्याच्या प्रश्नावरून जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच भाजपने (BJP) अकोला महानगरपालिकेत पाच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतरही अकोलेकरांना नियमित पाणी मिळू शकले नाही. दोन-दोन वेळा भाजपच्या महापौरांनी दररोज पाणी देण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे फडणवीस साहेब अकोल्यातील (Akola) पाण्यासाठीही एक जलआक्रोश होऊन जाऊच द्या, अशी मागणी अकोलेकरांकडून होऊ लागली आहे. (Akola Latest News)

अकोला शहरात सध्या काही भागात चौथ्या दिवशी तर काही भागात आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, २५० कोटीच्या वर खर्च करुन अमृत योजनेतून अकोला शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. महान येथील काटेपूर्णा प्रकल्पावर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापासून ते अकोला शहरापर्यंत नवीन जलवाहिनीही टाकण्यात आली. ही कामे सुरू असताना तत्कालीन अकोला महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या वतीने अकोलेकरांना दररोज पाणी दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, पाच वर्षांत अकोल्यातील अमृत योजनेचे कामच १०० टक्के झाले, नसल्याचा आरोप मनपातील विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून राण उठविणाऱ्या भाजपने अकोल्यातही नियमित पाणी मिळावे यासाठी एक जलआक्रोश मोर्चा काढावा, अशी मागणी होत आहे.

महापौरांची घोषणा विरली हवेत!

भाजपच्या महापौर अर्चना जयंत मसने यांनी अमृत योजनेतून कामे झाल्याचा दाव करीत दोन वेळा महानगरपालिका प्रशासनाला अकोला शहरात दररोज पाणी देण्याबाबत निर्देशित केले. त्याच बरोबर नागरिकांनीही महिनाभरात दररोज पाणी मिळेल, असे आश्वासन दिले. मात्र, दोन्ही वेळा ही घोषणा हवेतच विरली. अकोला महानगरपालिकेतील भाजपची पाच वर्षांची सत्ता संपल्यानंतरही अमृत योजनेंतर्गत अकोलेकरांना पाणी मिळालेच नाही. आता प्रशासक नियुक्तीनंतर तरी पाण्याचे निट नियोजन होऊन अकोलेकरांना दररोज पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाच्या काळत तर नियोजित वेळापत्रकानुसारही पाणीपुरवठा होत नसल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला.

भाजप पाच वर्षे अकोला महानगरपालिकेत सत्तेत असताना २५० कोटी रुपये खर्च करून अमृत योजना राबविण्यात आली. त्यातून अकोल्यातील चांगल्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. नवीन जलवाहिन्या व नवीन जलकुंभ उभारल्यानंतर दररोज पाणी मिळेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, २५० कोटी खर्च करण्यापूर्वीही चार दिवसांनंतर पाणी मिळत होते. आताही चार दिवसानंतरच पाणी मिळत आहे. त्यामुळे ही २५० कोटी रुपये नागरिकांच्या सोयीसाठी खर्च केले की कंत्राटदाराचे तिजोरी भरण्यासाठी योजना राबविण्यात आली, याचे स्पष्टीकरण भाजप देणार आहे का? असा सवाल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते डॉ. झिशान हुसेन यांनी केला आहे.

औरंगाबादमध्ये जलआक्रोश करणारे देवेंद्र फडणवीस अकोलेकरांसाठी जलआक्रोश कधी करणार आहेत. नागपूरपेक्षा अकोला त्यांना जवळ पडते. येथे त्यांच्या पक्षाची पाच वर्षे सत्ता होती. ते अकोलेकरांसाठी जलआक्रोश करू शकत नसेल तर त्याना व भाजपला अकोलेकरांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल. असे वंचित बहुजन आघाडीचे नेते नीलेश देव म्हणाले.

अकोला नगरपालिका असताना अकोलेकरांना दररोज पाणी मिळत होते. महानगरपालिका झाल्यानंतर व भाजप सत्तेत आल्यापासून धरणात १०० टक्के जलसाठा असल्यानंतरही आठवड्यातून एक दिवस व तोही नियमित पाणीपुरवठा होत नाही. भाजपचे नियोजन नाही. प्रशासक नियुक्तीनंतरही त्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. भाजपने एक आंदोलन पाण्यासाठी अकोल्यात करावे. शिवसेना प्रसंगी अकोलेकरांसाठी रस्त्यावर उतरण्यासही तयार आहे. असे शिवसेनेचे शहर प्रमुख अतुल पवणीकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT