Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

आम्ही चवन्नी छाप, भाडोत्री लोक ठेवणार नाही; तर देश घडवणारी टीम तयार करू...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : अकबरउद्दीन ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला, तेव्हापासून देशभर याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. त्याचेही राजकारण केले जात असल्याचा आरोप होत आहे. पण याबाबत काय करावे, हा शासनाचा विषय आहे. आम्हाला याविषयी बोलायचे नाहीये. कारण राजकारणात धर्म आणायचा नाही, ही कॉंग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे शासनाने याबाबतीत काय तो निर्णय घ्यावा, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

संभाजीराजे भोसलेंना (Sambhaji Raje Bhosale) कॉंग्रेस पाठिंबा देणार का, याबाबत विचारले असता नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, याबाबत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) कोणतीही बैठक झालेली नाही. संभाजीराजे आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल, त्यावेळी बघू काय करायचे ते. आज कोणता पक्ष एका बाजूने बोलत असेल, तर तो त्यांचा विषय आहे. महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होईल, तेव्हा या विषयावर बोलू. कारण काहीही ठरलेले नसता आता त्यावर बोलायचे आणि नंतर मग काहीतरी घोळ व्हायचा. त्यामुळे नंतरच काय ते बोलणार.

देशात धर्मांच्या नावावर मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात आहे. हे देशाला उद्ध्वस्त करण्याचे काम केले जात आहे. सर्वांनी सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. पण विविध चुकीच्या गोष्टी पसरवून देशातील वातावरण खराब करण्याचे काम सध्या केले जात आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यावर देशात लोक पेटलेले आहेत. या प्रश्‍नांवर केंद्र सरकार उत्तर देत असेल तर आम्ही त्याचे समर्थन करू. आता देशात महागाई कमी करावी लागेल, बेरोजगारी दूर करावी लागेल, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवावे लागतील. हे प्रश्‍न आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि यावर चर्चा झाली पाहिजे. आम्ही या विषयांसाठी आंदोलन करू, असे नाना पटोले यांनी सांगितले.

महिलांवर हात उगारणाऱ्यांचे हात तोडू, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर बोलताना महिलांचा सन्मान ही काँग्रेसची संस्कृती असल्याचे सांगितले. काँग्रेसने महिला पंतप्रधान व राष्ट्रपती दिले. महिलांच्या सन्मानाला कोणीही गालबोट लावता कामा नये. बाकी कायद्याचे काम कायदा करेल असे ते म्हणाले. काँग्रेसच्या आयटी सेलचे नागपुरात शिबिर होत आहे. भाजप आयटीबाबत सजग आहे. पण, आम्ही आयटी सेलमध्ये चवन्नी छाप व भाडोत्री लोक ठेवणार नाही. भाजप रोज ४० कोटी रुपये आयटी सेलवर खर्च करीत आहे. आम्ही मात्र देश घडवणारी टीम तयार करू, असे पटोलेंनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT