Chandrashekhar Bawankule and Nana patole
Chandrashekhar Bawankule and Nana patole Sarkarnama
विदर्भ

मोदींबाबत बोलले तेव्हा नाना पटोलेंनीही केले होते कोरोना नियमांचे उल्लंघन…

अतुल मेहेरे

नागपूर : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवनाळा या गावात ‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारूही शकतो’, असे वक्तव्य कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले, तेव्हा तेसुद्धा शेकडो लोकांच्या गराड्यात होते. पंतप्रधानांना (Prime Minister) धमकी दिल्या प्रकरणी तर नाहीच, पण कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणीही पटोलेंवर एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आमचे आंदोलन नैसर्गिक भावनेतून होते, तर आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या सरकारचा पोलिसांवर दबाव आहे, असा थेट आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. सरकारच्या दबावात पोलिसांनी आमच्यावर जी कारवाई केली, त्याविरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे. कोराडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलनादरम्यान कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही. सर्व नियम पाळून आंदोलन करण्यात आले. पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारे वाईट बोलल्यानंतर आणि धमक्या दिल्यानंतर आमचे आंदोलन झाले. कारण पटोलेंच्या त्या वक्तव्यानंतर आंदोलनाची नैसर्गिक परिस्थिती निर्माण झाली. पटोलेंनी जे केले, तो देशद्रोह आहे. नैसर्गिक पद्धतीने एकत्र आलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करता आणि पंतप्रधानांना धमक्या देणाऱ्या पटोलेंवर काहीच कारवाई होत नाही, हा आमच्यावरील अन्याय आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

नाना पटोलेंनी ते वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभर त्यांच्याविरोधात आंदोलन पेटवले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कोराडी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. नाना पटोलेंवर तर गुन्हे दाखल झालेच नाहीत, मात्र बावनकुळेंवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. १८ जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समर्थकांसह कोराडी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल केली. तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी तेथेच त्यांनी ठिय्या मांडला आणि जोपर्यंत पटोलेंवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली. काही वेळाने पोलिसांनी आमदार बावनकुळेंना अटक केली. त्यानंतर काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांचे ठिय्या आंदोलन थांबले.

ठिय्या आंदोलनादरम्यान पोलिस स्टेशनसमोर गर्दी जमा केली आणि कुठेही सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही. अनेकांनी मास्क घातलेले नव्हते, असा ठपका ठेवत त्यांच्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार कृष्णा खोपडे यांनी नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलन करताना कोविडच्या नियमांचा भंग केला होता. इतकेच नव्हे तर ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असताना कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले होते. त्यासाठी महानगरपालिकेने त्यांनी नोटिस दिली होती. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई मात्र करण्यात आलेली नाही. एकाच विषयासाठी भाजपच्या दोन आमदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली. पण एकावर गुन्हा दाखल झाला, तर दुसऱ्यावर नाही. त्यामुळेही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT