Chandrapur Sarkarnama
विदर्भ

पोडसामध्ये एसटी आणली कुणी? सोशल मिडियावर रंगला श्रेयवादाचा सामना !

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिंपरी-धाबा-पोडसा या मार्गाची अतिशय दुरवस्था लक्षात घेता महामंडळाने या मार्गावर बस न चालविण्याचा निर्णय घेतला.

संदीप रायपूरे

गोंडपिंपरी : गावखेड्यातील राजकारण म्हणजे लईच भारी. कोण कधी, कुठे, कुणाचा नेम अन् गेम साधतील, शेवटपर्यंत पत्ताच लागत नाही. आता तर जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांत कमालीचा जोश आहे. पठ्ठे सोशल मिडीयावर जमून भिडलेले आहेत.

एसटीचा संप सुरू झाला, अन बसेस जाग्यावर थांबल्या. जवळपास सहा महिने लालपरी धावली नाही. संप मिटला अन लालपरी सुसाट मार्गक्रमण करायला लागली. पण चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिंपरी-धाबा-पोडसा या मार्गाची अतिशय दुरवस्था लक्षात घेता महामंडळाने या मार्गावर बस न चालविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या गावातील विशेषतः ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना मोठाच फटका बसत होता. मुलांना तर शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनाने तिप्पट पैसे मोजायला लागायचे.

मार्गावरून जाताना रोजच बोंबाबोंब व्हायची. पण काय करणार. दस्तुरखुद वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, (Sudhir Mungantiwar) आमदार सुभाष धोटे यांच्यापर्यंत हा विषय गेला. पण परिस्थिती जैसे थे. अन शेवटी आज गावात एसटी बस आली. अनेक दिवसानंतर बस आल्याचे बघून गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सोशल मिडियातून सरपंच देविदास सातपुते यांच्या प्रयत्नांना यश आले, अन बस सुरू झाली, अशी भली मोठी बातमी कार्यकर्त्यांनी शेअर केली. अन् अनेकांनी सातपुतेंवर अभिनंदनाचा वर्षाव केला. तिकडे बस सुरू झाल्याचा आनंद तहसीलदार के.डी. मेश्राम यांनाही झाला. त्यांनी सातपुते यांच्या प्रयत्नांच्या बातमीला ‘थम्ब’ दिला. मग चूप बसतील तर ते भाजपवाले कसे?

भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना लिहिलेलं निवेदन व त्यांनी एसटीच्या वरिष्ठांना पाठविलेले पत्र शेअर करीत आमच्यामुळं एस. टी. सुरू झाल्याचे सांगितले. काँग्रेस कार्यकर्ते सरपंच देविदास सातपुते यांच्या यशाच्या काँमेन्टसला थम्ब देऊन बुचकळ्यात पडलेल्या तहसीलदार साहेबांना सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांनी एसटी बस आल्याची टिप्पणी लिहावी लागली. प्रयत्न कुणीही केला असेल तरी गावात एसटी सुरू झाली याचा मोठा आनंद सामान्यांना झाला. यानिमित्ताने राजकीय पुढाऱ्यांच्या श्रेयवादाचेही दर्शन पुन्हा एकवार झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT