Nagpur News : विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात ‘पोस्टर वॉर' रंगले आहे. यात देवेंद्र फडणवीस यांनी मी बिल्डर नाही आणि शाळा, कॉलेज उघडून साम्राज्य निर्माण केले नाही, असे सांगून काँग्रेसचे संभाव्य उमेदवार प्रफुल गुडधे यांना टोला लगावला.
काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे यांची उमेदवारी येथून निश्चित मानली जात आहे. त्यांचे पोस्टर ठिकठिकाणी झळकत आहेत. गुडधे हे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांच्या शाळा, कॉलेज आहेत. याकडे लक्ष वेधून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी मी बिल्डरशीप केली नाही, शाळा कॉलेज उघडून स्वताचे साम्राज्य उभे केले नाही, असे सांगितले. (Devendra Fadnavis News)
मी गेल्या 25 वर्षांपासून विधानसभेत आपला प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वादाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे करीत असताना स्वतःचा कधीच विचार केला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तुमचा देवाभाऊ संपूर्ण महाराष्ट्र बदलण्याची क्षमता ठेवतो. ही क्षमता देवाभाऊ मुळे नाही तर तुम्ही माझ्या पाठीमागे उभे असल्याने आहे. तुमच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम सुरू आहे. आज हजारो कोटींचे काम दक्षिण-पश्चिममध्ये करता आले आणि पुढेही करीत राहू, असे फडणवीस म्हणाले.
असंघटित बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी कायदा तयार झाला. पण फायदे मिळत नव्हते. मुख्यमंत्री झाल्यानंतर असंघिटत कामगारांसाठी योजना आणली. आज पाच लाखांवरून 38 लाख मजुरांची नोंदणी झाली आहे. त्यातंर्गत मुलांना शिक्षण सुविधा, परिवाराला पाच लाख आरोग्य विमा, मुलांना स्किल ट्रेनिंग, पीएम आवास योजना आणि अटल आवास योजनेत एकूण चार लाख रुपये देण्याचा निर्णय करण्यात आला.
येत्या काळात पुन्हा आपले सरकार आल्यावर हे काम वेगाने सुरू राहील. कामगारांना दिले जाणारे कार्ड भांड्यांपुरते मर्यादित नाही तर 10 ते 12 योजनांचा लाभ यातून मिळणार आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे हे सरकार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.