MLA Hostel Nagpur Sarkarnama
विदर्भ

MLA Hostel : आमदार निवास कुणासाठी, आमदारांसाठी की पीए आणि कर्मचाऱ्यांसाठी ?

Nagpur : येथे काही कामासाठी आल्यानंतर आमदारांनी येथे राहणे अपेक्षित आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Winter Session News : नागपूरचे (Nagpur) आमदार निवास.. भव्य आणि प्रशस्त वास्तू… येथे काही कामासाठी आल्यानंतर आमदारांनी येथे राहणे अपेक्षित आहे आणि हिवाळी अधिवेशनासाठी (Assembly Winter Session) आल्यानंतर तर येथे सर्व आमदार राहतात, अशीच सर्वसामान्य लोकांची भावना असते. मात्र येथे अपवादानेच काही आमदार थांबतात. इतर सर्व आमदार महागड्या हॉटेल्समध्ये मुक्कामाला असतात.

आमदार निवासात आमदारांचे पीए, कर्मचारी आणि काही कार्यकर्ते मुक्कामाला असतात. कार्यकर्त्यांचीही इच्छा असते की, आमदार निवासात थांबल्यावर येथे आमदार (MLA) आपल्याला भेटतील आणि आपली कामे त्यांना सांगता येतील. पण आमदार येथे थांबतच नाहीत. तर महागड्या हॉटेल्समध्ये थांबतात. त्यामुळे ज्या नावाने आमदार निवास ओळखले जाते, त्यांनी येथे मुक्काम करणे अपेक्षित आहे. नाही म्हणायला काही आमदार (जे जनतेमध्ये रमतात) ते आमदार निवासात मुक्काम करतात. यामध्ये महिला आमदारांची संख्या अधिक आहे.

आज ‘सरकारनामा’ने माहिती घेतली असता, आमदार निवासाच्या ए विंगला यवतमाळ जिल्‍यातील केळापूरचे आमदार संदीप धुर्वे, मंदा विजय म्हात्रे, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, कऱ्हाडचे आमदार श्‍यामराव पांडुरंग पाटील, भिमराव तापकिर यांच्या व्यतिरिक्त पाच ते सहा आमदार मुक्कामी आहेत. बाकी सर्व आमदार नागपुरातील मोठमोठ्या महागड्या हॉटेल्समध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातून आलेल्या लोकांना भेटण्यात अडचणी येतात, अशी लोकांची तक्रार आहे.

धक्कादायक म्हणजे विदर्भातीलच एक आमदार म्हणतात की, आमदार निवासात येवढी गर्दी असते की, काम करायला काही सुचत नाही. आम्ही आमची खासगी कामे करायची केव्हा? जर आमदारांना त्यांच्या मतदारसंघातून आलेल्या लोकांचा त्रास वाटत असेल, तर मग हे कसले लोकप्रतिनिधी, असा प्रश्‍न लोक विचारतात. आता प्रश्‍न असा पडतो की, आमदारांच्या मतदारसंघातून आलेल्या लोकांची कामे वगळून अशी कोणती खासगी कामे असतात? कारण विधानसभेतील एका ज्येष्ठ अपक्ष सदस्याने हे वक्तव्य केले आहे.

विधानसभेतील हे सदस्य चौथ्यांदा अपक्ष म्हणून निवडून सभागृहात आलेले आहेत. मागच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीसुद्धा होते आणि उल्लेखनीय म्हणजे हे सदस्य सदैव जनतेत आणि सामान्य लोकांसोबत राहत असल्याचा दावा करतात. त्यांचे कार्यकर्तेसुद्धा आमचे आमदार सामान्य असल्याचे व्हिडिओ वेळोवेळी सोशल मिडियावर व्हायरल करीत असतात. त्यांचे कार्यकर्ते घरून भाकरी घेऊन येतात. परंतु नेते जर मोठमोठाल्या हाॅटेल्समध्ये पंचतारांकित व्यंजनावंर ताव मारत असतील, तर कार्यकर्ते केवळ झुनका-भाकर पुरतेच आहेत का, असा सवाल कार्यकर्त्यांना पडला आहे आणि केवळ निवडणुकीच्या प्रचारातच नेत्यांनी झुनका-भाकर (शिदोरी) खावी आणि मी गरीबांचा कैवारी आहे, असे म्हणावे. नंतर मात्र पंचतारांकित जीवन जगावे, हे योग्य नाही, असेही कार्यकर्ते म्हणतात.

पण धक्क्यादायक बाब म्हणजे हे आमदारसुद्धा आमदार निवासात न थांबता हॉटेलमध्ये किंवा इतरत्र मुक्कामी असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वास्तूमध्ये आमदार थांबत का नाहीत, हा प्रश्‍न जनतेला पडला आहे आणि शोधूनही त्याचे उत्तर आजवर सापडलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT