Randheer Sawarkar and Bacchu Karu Sarkarnama
विदर्भ

अकोला जिल्ह्यातून मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सावरकर, बच्चू कडू यांना संधी मिळणार?

अकोला (Akola) जिल्ह्यातून विधानसभेवर भाजपचे (BJP) चार तर विधान परिषदेवर दोन आमदार निवडून आले आहेत.

मनोज भिवगडे

अकोला : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासोबतच चर्चा सुरू झाली आहे, ती कुणाला फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागणार याची.

अकोला (Akola) जिल्ह्यातून विधानसभेवर भाजपचे (BJP) चार तर विधान परिषदेवर दोन आमदार निवडून आले आहेत. त्यांपैकी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. रणजीत पाटील यांना २०१४ मध्ये फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारमध्ये राज्यमंत्रिपद मिळाले होते. विधान परिषदेतील दुसरे आमदार स्‍थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे वसंत खंडेलवाल नवीन आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातून ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर हे दोनच पर्याय मंत्रिमंडळासाठी शिल्लक आहेत.

आमदार शर्मा यांना मंत्रिपदात कोणताही रस नाही. ते बघता अकोला जिल्ह्यातून आमदार रणधीर सावरकर यांची थेट फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित आहे. याशिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले व अकोल्याचे पालकमंत्री म्हणून गेले अडीच वर्षे काम बघणारे बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे गटाकडून कॅबिनेट मंत्रिपद निश्चित असल्याचे मानले जात आहे.

मंत्रिपदासाठी नावे निश्‍चित करताना महाविकास आघाडीतील सर्व मंत्री जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यांचा विचार भाजप नेतृत्वाला आधी करावा लागणार आहे. सोबतच २०१४ ते २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे भाजपचे होते, त्यांनाही प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीस चाणाक्ष आणि अभ्यासू आहेत. त्यामुळे ते हे शिवधनुष्य लीलया पेलतील, असे सांगितले जाते.

अकोला जिल्ह्यातून संभाव्य मंत्र्यांच्या यादीत अकोला पूर्वीचे आमदार रणधीर सावरकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबत मावळते पालकमंत्री बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे गटातून कॅबिनेटची संधी मिळू शकते. नाराजीचा फटका काय असतो, हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या गळतीतून संपूर्ण देशाने पाहिले. त्यामुळे आपल्या मंत्रिमंडळात कुणी नाराज राहू नये, याची दक्षता देवेंद्र फडणवीस नक्कीच घेतील. एकनाथ शिंदेंचा गट आणि भाजपमध्ये काही लोकांची मंत्रिपदासाठीची यादी फडणवसांकडे तयार असल्याचेही सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT