Atul Londhe
Atul Londhe Sarkarnama
विदर्भ

Atul Londhe: शेतकऱ्यांना कवड्या देता, तुमच्या राजकारणासाठी बळीराजाचा बळी कशाला घेता?

Atul Mehere

नागपूर : शेतकऱ्यांना मदत देताना प्रशासनाने बोगस पंचनामे केले आहेत. नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना कुठे ४०० तर कुठे ६०० रुपये मदत देण्यात आली. सरकारच्या या कारभारावर प्रदेश कॉंग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सडकून टिका केली आहे.

'सरकारनामा'शी अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करण्याची इच्छा आहे, असं दिसतंय. पण त्यांच्या मित्रपक्षाकडून त्यांच्या इच्छेला कुठेतरी खीळ घातली जात आहे, असं वाटतं. कारण एकीकडे ते सांगतात की शेतकऱ्यांना (Farmers) द्यायची मदत आम्ही वाढवून दुप्पट केली आहे आणि दुसरीकडे नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांना कुठे ४०० तर कुठे ६०० रुपये मदत निश्‍चित करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हातात कवड्या टाकण्याचा हा प्रकार आहे. जगाच्या पोशिंद्याचा हा घोर अपमान आहे. तुमच्या राजकारणासाठी बळीराजाचा बळी कशाला घेता?

शेतकऱ्यांना १ हजार रुपयांपेक्षा कमी नुकसानभरपाई देऊ नये, असे शासनाचे निर्देश असतानाही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना ४०० ते ७०० रुपये मोबदला निश्चित करण्यात आला. काही गावांमध्ये तर नुकसानीचे क्षेत्र एक हेक्टरपेक्षाही कमी दाखविले आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा असून शासनाच्या आदेशाचीही पायमल्ली करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने केलेले पंचनामेच बोगस असल्याचे उघड झाले आहे, असेही लोंढे म्हणाले.

कळमेश्वर तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतअंतर्गतच्या मांडवी गावातील शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. गावातील एकाही शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान एक हेक्टरपेक्षा जास्त दर्शविले नाही. त्यामुळे एकाही शेतकऱ्याला केंद्राच्या निकषानुसार कोरडवाहू शेतीच्या नुकसानासाठी ६८०० रुपये मिळण्याकरिता पात्र ठरविण्यात आले नाही. एवढेच नाही काही शेतकऱ्यांना तर नुकसानभरपाई फक्त ४०८ रुपये, ५४४ रुपये, ६१२ व ६८० रुपये दाखविण्यात आली.

काय घडला प्रकार ?

बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत कॉंग्रेस सदस्य प्रकाश खापरे यांनी हा खुलासा केला. असाच प्रकार इतरही अनेक गावांमध्ये झाला असल्याची शक्यता आहे. काही गावांतील पीकच वगळण्यात आले. कुही, भिवापूर तालुक्यातील मिरची व इतर पिकांचे नुकसान शून्य दाखविण्यात आल्याचा खुलासा दुधाराम सव्वालाखे यांनी केला. तर कामठी तालुक्यात फुलशेतीचे प्रचंड नुकसान झाले असतानाही त्याच्या नोंदी न करता नुकसानीच्या मदतीतून वगळल्याची माहिती अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली. यामुळे प्रशासकीय यंत्रणेने केलेले पंचनामे बोगस असल्याचा आरोप होत आहे.

अनेक गावातील पंचनामेच नाही..

प्रशासकीय यंत्रणेकडून ३० जुलैपर्यंत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक भागाचे पंचनामेच झाले नाही. त्यामुळे केंद्रीय पथकाला सादर केलेली माहिती सदोष असून कमी क्षेत्रात नुकसान दाखविण्यात आले. यामुळे ज्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही.

चुकीचे पंचनामे करणाऱ्यांवर होणार का कारवाई?

तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी संयुक्तरीत्या सर्व्हे करून पंचनामे तयार करण्यात येतात. त्यामुळे यांना चुकीच्या पद्धतीने हे सर्व्हे केल्याचे दिसून येते. त्यामुळे चुकीचे पंचनामे करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई होते की नाही, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT