Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

फडणवीस का म्हणाले की, शिवसेनेला काय करायचे आहे, त्याबद्दल ते स्वतः ठरवतील...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत जातात किंवा नाही, शिवसेना त्यांना तिकीट देते किंवा नाही, याबद्दल मला काहीही माहिती नाही. शिवसेनेला काय करायचे आहे, त्याबद्दल ते स्वतः ठरवील आणि संभाजी राजे स्वतः सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले.

आपलं राज्य आणि आपलेच गृहमंत्री (Home Minister) आहे, म्हणून पोलिस (Police) संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे आधी तक्रार करू अन् त्यानंतर कारवाई झाली नाही, तर आम्हीदेखील त्यांना सोडणार नाही, असे गंभीर इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला दिला.

आयोगाच्या निर्णयापूर्वी बोलणे योग्य नाही..

आगामी निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे आणि आता निवडणुका घ्याव्या की घेऊ नये, हा निर्णय आता निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे. आपल्याकडे साधारणतः ७ जूनला मान्सून कार्यरत होतो. त्यानंतर पाऊस सुरू होतो. तोपर्यंत निवडणूक आयोगाचे काम संपले तर कदाचित आयोग त्यासंबंधाने निर्णय घेईल, अन्यथा घेणार नाही. निवडणूक विभागाचा अधिकृत निर्णय जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत याबाबत अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

...तर त्यांना सोडणार नाही !

पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले करणे, पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या कार्यक्रमात जाऊन आंदोलन करणे, आमच्या नेत्यांवर अंडे, टमाटे फेकण्याचे प्रयत्न करणे, हे सर्व स्पष्टपणे आमच्या लक्षात येत आहे की, केवळ आपले राज्य आहे, आपलेच गृहमंत्री आहेत, या तोऱ्यात हे सर्व होत आहे. पण आम्हीही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे आधी तक्रार करू अन् कारवाई जर का झाली नाही, तर त्या लोकांना सोडणार नाही, असा इशारा फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

सुप्रिया ताईंचे स्वागत करू !

सुप्रिया सुळेंनी सर्वच महिलांच्या बाबतीत एकसारखा निर्णय घेतला पाहिजे. यापूर्वी नवनीत राणांसोबत जे झालं, तेव्हा त्या काही बोलल्या नाहीत. इतरही अनेक महिलांवर हल्ले झाले, तेव्हाही त्या काही बोलल्या नाहीत. आमच्याही महिलांना मागील काळात पोलिसांनी अत्यंत वाईट वागणूक दिली, तेव्हाही त्या बोलल्या नाहीत. त्यामुळे सुप्रिया ताईंनी जी भूमिका आज घेतली, ती त्यांनी वारंवार घ्यावी, आम्ही त्यांचे स्वागत करू, असा उपरोधिक टोला त्यांनी बालगंधर्व सभागृहात झालेल्या नाट्याच्या प्रकारावर बोलताना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT