Ravikant Tupkar with Sharad Pawar at Delhi.
Ravikant Tupkar with Sharad Pawar at Delhi. Sarkarnama
विदर्भ

पाठपुरावा करणार; शरद पवारांचे रविकांत तुपकरांना आश्वासन...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या आणि मागण्यांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी (Sharad Pawar) शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना दिली आहे. तुपकरांनी आज दिल्लीत पवारांची भेट घेतली. सदर भेटीत या दोन नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्वपूर्ण अशा सोयाबीन आणि कापूस प्रश्नांसह इतर मागण्यांबाबत 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी मोठे रान पेटवले होते. बुलडाण्यातील एल्गार मोर्चा, वाशीमसह विदर्भ-मराठवाड्यात झालेल्या सोयाबीन-कापूस परिषदा आणि त्यानंतर नागपूर व बुलडाण्यातील अन्नत्याग आंदोलन. बुलडाण्यातील अन्नत्याग आंदोलनाचा भडका चांगलाच उडाल्याने अखेर राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेत रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, डॉ.राजेंद्र शिंगणे, नितीन राऊत यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या अधिकारातील मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे आता केंद्राच्या अधिकारात असलेल्या शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी तुपकरांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळविला आहे. आज त्यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी तुपकरांकडून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न अत्यंत सूक्ष्मपणे समजावून घेतले.

सोयाबीनचे भाव ८ हजारांवर स्थिर राहावे, यासाठी सोयाबीनची पेंड आयात करणे थांबवावे, पामतेल व खाद्यतेलावरील काढलेला आयात कर पुन्हा जसाच्या तसा लावावा, सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी कमी करावा, सोयाबीनवरील स्टॉक लिमीट हटवावी, यांसह केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेले इतर विषय रविकांत तुपकरांनी मांडले. शरद पवार यांनी या सर्व मागण्या समजावून घेतल्या. या मागण्या रास्त आणि शेतकरी हिताच्या आहेत. त्यामुळे केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी रविकांत तुपकरांना दिले. नागपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत आपण सकारात्मकपणे केंद्र शासनाकडे मांडणी करणार असल्याचा शब्द दिला होता, याचीही आठवण यावेळी शरद पवार यांनी तुपकरांना करून दिली.

प्रकृतीची केली चौकशी..

शेतकऱ्यांच्या मागण्या, समस्या याबाबत चर्चा केल्यानंतर पवारांनी तुपकरांच्या प्रकृतीची चौकशी केली. अन्नत्याग आंदोलनानंतर प्रकृती बिघडली होती, आंदोलन करत असताना प्रकृतीलाही जपावे, असा आपुलकीचा सल्लाही त्यांनी तुपकरांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT