Winter Session Nagpur Sarkarnama
विदर्भ

Nagpur : हिवाळी अधिवेशन : सोमवारपासून होणार कामांना सुरुवात, ९५ कोटींचा खर्च !

Atul Mehere

नागपूर : कोरोनामुळे २०२० व २०२१ ला हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही. कोरोनामुळेच सर्वच अधिवेशन मुंबईला (Mumbai) झाली असली तरी त्याचाही कालावधी कमीच होता. यावर्षी कुठलीही अडचण नसल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) नागपुरात होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आढावा घेतला असून या अधिवेशनासाठी ९५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सोमवारपासून तयारीची कामे सुरू होणार असल्याची माहिती आहे.

बांधकाम विभागाकडून (PWD) खर्चाचा आराखडा अंतिम करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मागील अधिवेशनाच्या तुलनेत ३० कोटींचा जास्त खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नागपुरात (Nagpur) होणारे अधिवेशन सहा आठवड्यांचे घेण्याचा करार आहे. परंतु गेल्या काही दशकाचा अनुभव पाहता साधारणतः दोन किंवा तीन आठवड्यांचे होते. यंदाचे अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून किमान दोन आठवड्यांचे होण्याची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचे संकेत दिले आहे. दुसरीकडे प्रशासनाने आपली तयारी सुरू केली आहे.

विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे सज्ज करण्यात येणार आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसह रंगरंगोटीची कामे करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे रस्त्यांचीही डागडुजी करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला. त्यांनी खर्चाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

गेल्या अधिवेशनाचा खर्च ६५ कोटी..

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम, आरोग्य, विजेसह इतर व्यवस्थेवर ९५ कोटींचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. जीएसटी, सीएसआरच्या दरात वाढ झाली आहे. साहित्यही खराब झाले आहे, ते नव्याने खरेदी करावे लागणार असल्याने खर्चात वाढ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. मागील अधिवेशन काळात ६५ कोटींचा खर्च आला होता. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी निधीची काळजी न करता योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या.

अधिवेशनाच्या खर्चात ३५ टक्के वाढ..

अधिवेशनाची तयारी सुरू झाली असून यंदाचे हे अधिवेशन अधिक खर्चीक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अधिवेशनाच्या तुलनेत ३० ते ४० टक्के अधिकचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दशकांचा अनुभव पाहता साधारणतः दोन किंवा तीन आठवड्यांचे होते. यंदाचे अधिवेशनही किमान दोन आठवड्यांचे होण्याची अपेक्षा आहे.

विधानभवनावर होणार ६०-७० कोटींचा खर्च..

विधानभवनावर ६० ते ७० कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. २०० ते २२५ कामे करण्यात असून प्रत्येक कामाच्या निविदा काढण्यात येणार आहे. काही कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून पुढील आठवड्यात कामांना सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT