chandrapur district bank sarkarnama
विदर्भ

Chandrapur Bank : कोर्टाच्या आदेशाने सर्वांचा जीव वरतीखालती, मेसेजने सांगितले पुढे ढकला भरती

संदीप रायपुरे - Sarkarnama

Chandrapur Latest News : नोकर भरतीच्या मुद्द्यावरून वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यायालयाच्या आदेशांनंतरही बँकेची नोकरभरती होते की पुढे ढकलली जाते, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. (With the court order putting everyone's life on the line, the message said postpone recruitment)

न्यायालयाने २० ऑक्टोबर रोजी बॅकेला नोकर भरतीचा आदेश दिला आहे. टीसीएस या कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार २७ ऑक्टोबर रोजी बँकेच्या संचालकांची बैठक होणार आहे. या बैठकीतील निर्णयानंतरच भरती प्रक्रियेवर अंतिम मोहोर लागणार आहे. परंतु बँकेचे काही संचालक भरती प्रक्रिया पुढे ढकलली जावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशात बँकेच्या अध्यक्षांच्या नावाने दिलेला मेसेज ज्येष्ठ संचालक उल्हास करपे यांनी व्हायरल केल्यानं खळबळ उडाली आहे.

दोन वर्षांपासून नोकर भरती थांबलेली

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्य शासनाने बँकेतील नोकर भरतीला स्थगिती दिली होती. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती गेल्या दोन वर्षांपासून थांबलेली होती. त्यानंतर बँकेने राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. २ मार्च रोजी न्यायालयाने नोकर भरतीवरील स्थगिती उठविली. बँकेच्यावतीने नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली. पण ज्या कपंनीची नेमणूक करण्यात आली होती, त्या कपंनीविरोधात तक्रारी असल्याने पुन्हा एकदा नोकर भरती प्रक्रियेत अळथळा निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय न्यायालयात गेला.

बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी न्यायालयात शपथपत्र दाखल करून ‘आम्ही टीसीएस या कंपनीच्यामार्फत नोकर भरती राबविण्यास तयार आहोत’, असे म्हटले. त्यामुळे न्यायालयाने २० ऑक्टोबर रोजी नोकर भरती विरोधातील सर्व याचिका निकाली काढल्या. याचिका निकाली निघाल्याने नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठरल्यानुसार टीसीएस परीक्षा घेणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले. पण यावर बँकेच्या संचालकांच्या बैठकीनंतर अंतिम मोहर लागणार आहे. हीच मोहोर लावण्यासाठी शुक्रवारी (ता. २७) बँकेच्या संचालकांची बैठक होणार आहे. अशातच काही संचालक नोकर भरती पुढे ढकलली जावी यासाठी प्रयत्नशिल झाले आहेत. बुधवारी (ता. २६ ) एकाने बँकेच्या अध्यक्षाच्या नावे एक मॅसेज तयार केला. त्यात काही संचालकांनी बेरोजगारांकडुन नोकरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमका हाच मॅसेज बँकेचे जेष्ठ संचालक उल्हास करपे यांनी व्हायरल केला.

करपे यांचा मॅसेज व्हायरल होताच बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली. या मॅसेजमध्ये ज्या संचालकांनी पैसे घेतले, त्यांची नावे उघड करणार असल्याचा उल्लेख करण्यता आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यासंदर्भात करपे यांनी तातडीन नोकरभरती परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली आहे.

नोकर भरतीला आधीच विलंब

न्यायालयातून नोकर भरती प्रक्रियेवर तोडगा निघाल्याने आता परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. बँकेचे अध्यक्ष संतोंषसिंह रावत हे टीसीएस व्दारे तातडीने परीक्षा घेऊन पदभरती व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. उल्हास करपे यांनी देखील तीच भूमिका घेतली आहे. आधीच बँकेतील नोकर भरतीला बराच विलंब झाला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक बेरोजगार यासाठी प्रतीक्षेत होते. अशा स्थितीत आता तातडीने परीक्षा होणे आवश्यक असल्याचे उल्हास करपे यांनी ‘सरकारनामा’शी बोलतांना सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणुन ओळखली जाते. चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात एकूण ९२ शाखा आहेत. याकरीता एकूण ८८५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या बॅकेत ४७३ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी २५ कर्मचारी निवृत्त होणार आहेत. बँकेचा कारभार वेगाने व्हावा यासाठी ३६० पदांची भरती केली जाणार आहे. यात २६१ लिपीक, ९७ शिपाई व दोन स्वीपर या पदांचा समावेश आहे. अशात व्हायरल झालेल्या मॅसेजनंतर होणाऱ्या बँकेच्या बैठकीत संचालक मंडळ नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(Edited by : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT