अमरावती : काल सकाळी अमरावती शहरात चिंताजनक झालेली परिस्थिती आता नियंत्रणात आहे. इथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेटसेवाही बंद करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. त्यामुळे अजूनही शहरात तणावपू्र्ण शांतता असल्याचे शहरात पाहायला मिळत आहे.
मात्र या दरम्यान ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी रात्रभर फिरुन तणावग्रस्त भागाच्या केलेल्या दौऱ्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. यशोमती ठाकूर यांनी काल (शनिवारी) संध्याकाळी रविवारी रात्री तणावग्रस्त भागाचा दौरा केला होता. शहरात शांतता राहावी म्हणून रात्रभर विविध भागांना भेटी देऊन त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. तसेच रात्रीच्या वेळेस काही अप्रिय घटना घडू नयेत म्हणून सर्व धर्मीय नेत्यांशी, धर्मगुरूंशी त्यांनी रात्री उशीराही चर्चा केली.
या दौऱ्याबद्दल बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, दंगल, हिंसाचाराचा सर्वांत जास्त परिणाम महिला आणि लहान मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे रात्रभर शहरात विविध ठिकाणी जाऊन लहान मुले आणि महिलांशी चर्चा केली, त्यांना आधार दिला. सर्वांना सुरक्षित वाटले पाहिजे, अशी स्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. पण अमरावतीकरांनी पुढाकार घेऊन शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेली मदत वाखाणण्याजोगी आहे, असे कौतूक करत ठाकूर यांनी असेच सहकार्य कायम ठेवा, असे आवाहनही सर्वपक्षीय नेते आणि अमरावतीरांना केले.
ऐन दिवाळी दरम्यान त्रिपुरा राज्यातील पानीसागर उपविभागात विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एका मशिदीची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे त्रिपुरा राज्यासह आता महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे. मालेगाव, नांदेड, अमरावती या शहरांमध्ये काही या घटनेचे पडसाद उमटल्याचे दिसून आले.
त्रिपुरातील या घटनेविरोधात अमरावती शहरात शुक्रवारी जमात-ए-अहले सुन्नत संघटनेच्यावतीने मुस्लिम समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान काही समाजकंटकांनी जयस्तंभ चौक, चित्रा चौक परिसरातील दुकानावर दगडफेक करून नुकसान केले. या संपूर्ण प्रकारामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर कालही शहर बंद दरम्यान राजकमल चौक, जवाहर गेट परिसरात मोठ्या जमावाकडून दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.