Yashomati Thakur at ADCC Results Sarkarnama
विदर्भ

बच्चू कडुंच्या ‘परिवर्तन’वर भारी पडले यशोमती ठाकुरांचे ‘सहकार’

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ADCC पालकमंत्री यशोमती ठाकूर, Yashomati Thakur जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख तसेच प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या सहकार पॅनलने पुन्हा बाजी मारली.

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तसेच अमरावतीच्या पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांचा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकारणावरसुद्धा दबदबा कायम असल्याचे आजच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांना त्यांनी चांगलेच पाठबळ दिले. त्यांच्या सूचनेवरून पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनीसुद्धा चांगलीच मेहनत घेतली. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या या निवडणुकीत सहकार पॅनलने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनलवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनेल भारी ठरल्याच्या प्रतिक्रिया सहकार क्षेत्रात उमटत आहेत.

जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख तसेच प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या सहकार पॅनलने पुन्हा बाजी मारली. सहकार पॅनलने सर्वाधिक १२ जागांवर विजय मिळवून क्लिनस्वीप केला. परिवर्तन पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले. एका अपक्षानेसुद्धा या निवडणुकीत बाजी मारली. विशेष म्हणजे दोन आमदारांना या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांपैकी चार संचालक बिनविरोध निवडून आल्याने १७ जागांसाठी मतदान झाले होते. मतमोजणी आज गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत ठरलेल्या चांदूरबाजार सेवा सोसायटी मतदारसंघातून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बबलू देशमुख यांचा पराभव केला. या मतदारसंघात बच्चू कडू यांना २३ तर देशमुख यांना १९ मते मिळाली. दुसरीकडे ओबीसी मतदारसंघातून बबलू देशमुख यांनी परिवर्तन पॅनलचे मुख्य प्रवर्तक संजय खोडके यांचा पराभव केला.

चांदूर रेल्वे सेवा सहकारी सोसायटीमधून माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी २१ मते मिळवून परिवर्तन पॅनलचे किशोर कडू यांचा पराभव केला. दर्यापूर सोसायटीमधून आमदार प्रकाश भारसाकळे यांचा सुधाकर भारसाकळे यांनी तर आमदार बळवंत वानखडे यांनी अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून आमदार राजकुमार पटेल यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, यंदाची ही निवडणूक अतिशय हायप्रोफाइल झाली होती. कारण त्यात अनेक दिग्गजांनी उडी घेतल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.

अपक्षांचे काय?

जिल्हा बँकेत प्रा. नरेशचंद्र ठाकरे, अभिजित ढेपे, सुरेश साबळे तसेच जयप्रकाश पटेल यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यांपैकी जयप्रकाश पटेल हे परिवर्तन पॅनलचे, तर सुरेश साबळे हे सहकार पॅनलकडून रिंगणात उतरले होते. बँकेवर सहकार पॅनलचे बहुमत आल्याने आता अपक्षांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पराभूत दिग्गज

मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, अकोटचे आमदार व दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीमधून रिंगणात असलेले प्रकाश पाटील भारसाकळे, परिवर्तन पॅनलचे नेते संजय खोडके, सुधीर सूर्यवंशी, डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, अजय पाटील, जयश्री देशमुख, सुनील शिसोदे यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

विजयी उमेदवार

इतर मागासप्रवर्ग : अनिरुद्ध उपाख्य बबलू देशमुख ( सहकार)

नागरी सहकारी बँक मतदारसंघ क्र. २ : प्रकाश काळबांडे (सहकार)

महिला राखीव मतदारसंघ - सुरेखा ठाकरे (सहकार)

महिला राखीव मतदारसंघ - निका वानखडे- मार्डीकर. (सहकार)

विमुक्त जाती भटक्या जमाती : पुरुषोत्तम अलोणे ( सहकार)

अनु.जाती जमाती मतदारसंघ : बळवंत वानखडे (सहकार)

चांदूररेल्वे सोसायटी : प्रा. वीरेंद्र जगताप (सहकार)

चिखलदरा सेवा सोसायटी : दयाराम काळे (सहकार)

अमरावती सेवा सोसायटी : सुनील वऱ्हाडे (सहकार)

भातकुली सेवा सोसायटी : हरिभाऊ मोहोड (सहकार)

धामणगावरेल्वे सोसायटी : श्रीकांत गावंडे (सहकार)

दर्यापूर सेवा सोसायटी : सुधाकर भारसाकळे (सहकार)

चांदूरबाजार सेवा सोसायटी : बच्चू कडू (परिवर्तन)

इतर शेती संस्था मतदारसंघ क्र. - १ : रवींद्र गायगोले (परिवर्तन)

मोर्शी सेवा सोसायटी : चित्रा डाहाणे (परिवर्तन)

अंजनगावसुर्जी सेवा सोसायटी : अजय मेहकरे (परिवर्तन)

अचलपूर सोसायटी : आनंद काळे (अपक्ष)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT