Madan Yerawar and Ashok Uike Sarkarnama
विदर्भ

Yavatmal District News : भाजपला मजबूत करण्यासाठी हवाय ‘मंत्रिपदाचा बूस्टर’, चर्चेत ‘ही’ दोन नावे...

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal District's Politics of BJP : महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाले. ३० जून रोजी या सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात होणारी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी ‘मंत्रिपदाचा बूस्टर’ देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. (Cabinet expansion moves gained momentum)

नवीन मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे हेवीवेट आमदार मदन येरावार व आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत आहे. कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कधीकाळी यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरीमुळे हा बुरूज पुरता ढासळला. सद्यःस्थितीत सातपैकी पाच मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहेत.

मदन येरावार, प्रा. डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, संजीवरेड्डी बोदकुरवार व नामदेव ससाणे यांचा समावेश आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड हे दारव्हा-दिग्रस-नेर या मतदारसंघावर अजूनही पकड ठेवून आहेत. नाईक घराण्याचा पुसद हा मतदारसंघही राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुरक्षित आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून चाचपणी केली जात आहे.

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा ‘कमळ’ फुलवायचे असेल तर कॅबिनेट मंत्रिपद हवेच, असा सूर पदाधिकाऱ्यांकडून आवळला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ होऊन दीर्घकाळ होत असताना मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. आता वर्षपूर्ती पूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे पाच आमदार असले तरी येरावार यांचे पक्षातील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत.

पक्षाने यवतमाळ-वाशीम मतदारसंघात संयोजकपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे येरावार यांना मंत्रिपद देऊन भाजपला आणखी बळकट केले जाऊ शकते. तर, दुसरीकडे आदिवासी समाजाचे अशोक उईके व संदीप धुर्वे असे दोन आमदार आहेत. मात्र, डॉ. धुर्वे यांचा जनसंपर्क दांडगा नाही. ते आपल्याच दुनियेत रममाण राहत असल्याची चर्चा ऐकायला मिळते.

अशोक उईके यांनी यापूर्वी आदिवासी विकासमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. अभ्यासू नेता म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्यात त्यांचा हातखंडा राहिला आहे. त्यामुळे येरावार व उईके या दोन आमदारांभोवतीच मंत्रिपदाची चर्चा झडत आहे. पक्षश्रेष्ठी कुणाच्या पारड्यात मंत्रिपदाचे वजन टाकतात, याकडे जिल्ह्यातील राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्रिपदासाठीही आग्रह..

यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार असताना पालकमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्पर्धेतील आमदाराला मंत्रिपद मिळाल्यास आपल्याच पक्षाकडे पालकमंत्रिपद असावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. ही भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्याची माहिती आहे.

इतरांनाही अपेक्षा..

मंत्रिमंडळ विस्तारात आमदारद्वय मदन येरावार व प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या नावांभोवतीच चर्चा झडत आहे. तर, दुसरीकडे पुसदचा (Pusad) गड आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून (BJP) विधान परिषदेचे आमदार अ‍ॅड. नीलय नाईक यांनाही मंत्रिपद दिले जाऊ शकते, असेही राजकीय (Political) वर्तुळात बोलले जात आहे. आमदार धुर्वे, आमदार ससाणे, आमदार बोदकुरवार यांनाही लॉटरी लागू शकते, अशी अपेक्षा आहे. तसे स्वप्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT