Eknath Shinde, Jogendra Kawade, Prakash Abedkar and Uddhav Thackeray.
Eknath Shinde, Jogendra Kawade, Prakash Abedkar and Uddhav Thackeray. Sarkarnama
विदर्भ

Politics : तुमच्याकडे आंबेडकर तर आमच्याकडे कवाडे; हे दाखवण्याचा प्रयत्न, फायदा काय?

अतुल मेहेरे

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी काल संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. या युतीचा फायदा कुणाला? प्रा. जोगेंद्र कवाडे शिंदेंसाठी किती फायद्याचे ठरणार, असे एक ना अनेक प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू आहे. पण अद्याप त्यांचे काही ठरलेले नाही. तिकडे ठाकरे आणि आंबेडकर युतीबाबत चर्चा झडत असताना शिंदेंनी (Eknath Shinde) दुसरे दलित नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याशी युती करून त्या लढाईत तरी सरशी केली. पण युतीचा त्यांना खरंच काही फायदा होणार आहे की नाही, याचा विचार शिंदेंनी केला नसेल, असे म्हणता येणार नाही. पण आजमितीस कवाडे (Jogendra Kawade) गटाची ताकद किती, हा संशोधनाचा विषय आहे. नागपूरचेच असलेले कवाडे सर स्वतःच्याच गावात पक्षाची मोठी सदस्यसंख्या उभारू शकलेले नाहीत. नागपूर (Nagpur) महानगरपालिकेत त्यांचा एकही नगरसेवक नाही.

खुद्द त्याचे चिरंजीव जयदीप कवाडे यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. कॉंग्रेससोबत झालेल्या युतीमध्ये ही जागा त्यांच्या पक्षासाठी सोडण्यात आली होती. आता अपक्ष निवडून आलेले देवेंद्र भोंडेकर तेथे आमदार आहेत आणि सध्या शिंदे गटात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ते जवळचे मानले जातात. त्यामुळे ही जागा पुन्हा कवाडेंचा गटाला मिळण्याची शक्यता नाही. मग विधानपरिषद पदरात पाडून घेण्यासाठी तर कवाडे सरांनी ही युती केली नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित होतो. शिंदे गट हा भाजपनेच तयार केलेला आहे, हे कवाडे सर जाणून आहेत आणि आजपर्यंत कवाडे सर भाजपच्या विरोधात गेलेले दिसले नाही. त्यामुळे या युतीमागे भाजपचीच काही रणनीती नाही ना, असाही प्रश्‍न उपस्थित होतो.

थोडक्यात काय तर शिंदेंना तर कवाडे गटाचा काही फायदा होईल, असे वाटत नाही. फायदा झालाच तर तो कवाडे सरांना होईल. कारण त्यांचे विदर्भात तेवढे वर्चस्व नाही, जे एके काळी होते. पण उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करणार म्हटल्यावर आपण कसे मागे रहायचे, या एकमेव उद्देशाने एकनाथ शिंदे यांनी कवाडे सरांसोबत युती केली. पण हे करताना त्यांनी भविष्यातील फायदे-तोट्यांचा विचार केलेला दिसत नाही. कारण विदर्भापुरता जरी विचार केला, तरी कवाडे सरांची ताकद प्रकाश आंबेडकरांच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. त्यामुळे विदर्भात पाय रोवण्यासाठी शिंदेंनी ही युती केली, असे म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे आंबेडकर तर आमच्याकडे कवाडे, हे दाखवण्याचा एकनाथ शिंदेंचा हा प्रयत्न आहे, असे म्हणण्यासाठी वाव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT