ZP Nagpur
ZP Nagpur Sarkarnama
विदर्भ

ZP : विकास निधी कमी केल्यामुळे संतापले विरोधक; फाईल फेकली, माईक तोडला !

सरकारनामा ब्यूरो

ZP meeting turned out to be very stormy : .नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत शाब्दिक चकमकीसोबत फेकाफेकीही झाली. सदस्यांचा विकास निधी कमी केल्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश न केल्यामुळे सदस्यांनी आक्षेप घेतला. ही सभा चांगलीच वादळी ठरली.

१७ सामूहिक विकास व मागासवर्ग मोहल्ला सुधार योजनेच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काँग्रेसचे बंडखोर नेते नाना कंभाले यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीचा विरोध दर्शवत कागदपत्र फेकत माइकही तोडला. त्यानंतर विरोधकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला.

१७ सामूहिक विकास निधी कमी केल्यावरून कंभालेंसह विरोधी पक्षनेते आतिश उमरे, शिवसेना सदस्य (शिंदे समर्थक) (Eknath Shinde) संजय झाडे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महिला व बालकल्याण, शिक्षण तसेच समाज कल्याण विभागाकडून अर्थसंकल्पात वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्भूत करण्यात आल्या नाही. या योजना डावलून इतर योजना घेतल्याने सर्वांनी आक्षेप घेतला. योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. त्यामुळे त्या आवश्यक आहे, असे उमरे व कंभाले म्हणाले.

महिला व बाल कल्याण समिती सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेणार असल्याचे उत्तर दिले. समाज कल्याण (social welfare) विभागाने मोहल्ला सुधार योजनेसाठी १ कोटींचा निधी ठेवण्यावर झाडे यांनी आक्षेप घेतला. कंभाले यांनीही तो मुद्दा उचलून धरला. सभापती मिलिंद सुटे म्हणाले, अर्थसंकल्पात (Budget) सुधार करण्याचे अधिकार अध्यक्षांना दिले आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत समिती सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

कंभाले व सुटे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. प्रकार खापरे व दिनेश ढोले यांनीही सत्ताधाऱ्यांची बाजू घेतली. त्यानंतर कंभाले यांनी कागदपत्रांची फाइल फेकली. सभागृहाबाहेर जाताना माइकही आपटला. त्यामुळे तो फुटला. त्यानंतर झाडे यांनी सभात्याग केला. त्यापाठोपाठ विरोध पक्ष नेते उमरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदवत सभात्याग केला.

कंभालेंवर कारवाई करा..

कंभाले यांच्या कार्यप्रणालीचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध नोंदवण्यात आला. दिनेश ढोले यांनी शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा मागणी केली. त्याला प्रकाश खापरेसह अनेकांनी समर्थन दिले. संजय झाडे यांनीही कंभाले यांच्या कृतीचे समर्थन नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी कंभाले यांच्यावर मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईचा ठराव घेत विभागीय आयुक्तांकडे (Commissioner) प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.

सुटे, जोध यांच्यावरही कारवाई करा..

सभापती मिलिंद सुटे व सभापती बालू जोध यांचे कृत्य सभागृहाला शोभणारे नाही. त्यांची भाषाही योग्य नव्हती. जोध यांनी बाटली फेकून मारली. यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे कंभाले यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT