ShivSena UBT | Congress Sarkarnama
महाराष्ट्र

ShivSenaUBT Vs Congress : विदर्भातलं ठरलं; काँग्रेस-शिवसेना'UBT' एवढ्या जागांवर लढणार

Maha Vikas Aghadi News: महाविकास आघाडीमधील शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युला टिकतो की फिस्कटतो, याकडे लक्ष लागलं आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : विदर्भातील जागा वाटपावरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये टोकाचं बिनसलं होतं. महाविकास आघाडी बिघडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती.

परंतु वाटाघाटीनंतर, बैठकांच्या सत्रानंतर विदर्भातील 15 जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात वाटप झालं आहे. काँग्रेस 10, तर शिवसेना ठाकरे पक्ष 05 जागा लढणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागून आठवडा झाला, तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर तोडगा निघाला नाही. महायुतीमधील भाजपने त्यांच्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. तसंच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'फिक्स' उमेदवारांना 'AB' फाॅर्म देखील वाटप सुरू केलं आहे. परंतु महाविकास आघाडीतून विधानसभा निवडणुकीला समोरं जाण्याच्या अनुषंगानं काहीच ठरताना दिसत नाही. उलट जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात गोंधळ सुरू आहे.

विदर्भातील जागा वाटपाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी ठाम भूमिका घेतली होती. यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली.

'काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जागा वाटप जमत नाही, अभ्यास नाही, नाना पटोले यांना जागा वाटपापासून दूर ठेवा', अशी तक्रार थेट त्यांच्या पक्षाचे हायकमांडकडे केली. यानंतर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींबरोबर बैठका झाल्या. त्या बैठकांनंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते एकत्र येत, जागा वाटप निश्चित होईल आणि महाविकास आघाडी एकसंघपणे महायुतीविरुद्ध लढेल, असे सांगण्यात आले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी सोपवली आहे. मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याशी बाळासाहेब थोरात चर्चा करत आहेत. यात विदर्भातील जागा वाटपावर विशेष करून चर्चा होणार आहे. यात विदर्भातील 15 जागांचा वाद मिटण्याची शक्यता आहे. यात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाने सौहार्दपूर्ण तडजोडीचे सूत्र तयार केल्याची माहिती समोर येत आहे. आत 15 जागांपैकी काँग्रेस विदर्भात 10 जागा, तर उर्वरित 5 जागा शिवसेना ठाकरे पक्षाला देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT