पुणे : राज्य शासनाचा राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले आणि शिवसेनेतील मोठे नाव अडचणीत आले आहे. शासनाच्या किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते आणि रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यात बलात्काचा गुन्हा दाखल झाला आहे. दौंड इथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारिरिक संबंध ठेवल्याचे आणि जीवे मारण्याची धमकी देऊन गर्भपात करायला लावल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रघुनाथ बबन कुचिक आणि पीडित तरुणी यांची ओळख ६ नोव्हेंबर २०२० पासून ते १० फेब्रुवारी २०२२ या काळात होती. सुरुवातीला ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्यानंतर कुचिक यांनी मागील २ वर्षापासून तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत पुण्यात आणि गोव्यात नेवून शरीरसंबंध ठेवले. तसेच पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गर्भपात करायला लावला असे आरोप कुचिक यांच्यावर करण्यात आले आहेत. याबाबत कुचिक यांच्यावर पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपने विचारला सवाल...
दरम्यान या प्रकरणावर आता भाजपने टीका केली असून कुचिक यांना नेमकं कोण वाचवतं आहे असा सवाल विचारला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, मला ही घटना ऐकूण बाळासाहेबांची आठवण आली. त्यांनी हा प्रकार खपवून घेतला असता का? २४ वर्षाची तरुणी गेली दोन महिने तक्रार देण्यासाठी प्रयत्न करत होती. पण तिला दाद मिळत नव्हती. आता उठसूट जगातील, देशातील कोणत्याही महिला अत्याचाराच्या घटनांवर बोलणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या आता या घटनेवर शांत का? त्यांनी याबाबत देखील बोलायला हवं, असं ते म्हणाले.
केशव उपाध्ये पुढे म्हणाले, कुचिक हे कोणाचे मानलेले भाऊ आहेत, हेही समोर यायला हवं. तसेच या मानलेल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न कोण करतयं आणि संबंधित तक्रार दाखल होवू नये म्हणून कोण प्रयत्न करतयं हे देखील समोर येणं गरजेचे आहे. मात्र पोलिसांनी आता तातडीने पावलं टाकून त्यांना अटक करायला हवं. कारण नेता सत्ताधारी पक्षातील असल्यामुळे पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता आहे, असा दावा त्यांनी केला.
हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार : कुचिक यांची प्रतिक्रिया
याबाबत आता रघुनाथ कुचिक यांनी 'सरकारनामा'सोबत बोलताना स्पष्टीकरण दिले असून त्यांनी हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी एक राजकीय षडयंत्र, हनी ट्रॅपसारखे प्रकरण तयार करुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आलेला आहे. तसेच हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून माझे कामगार क्षेत्रातील काम आणि माझी अनेक वर्षांची राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी हा प्रकार आहे.
मला पूर्ण खात्री आहे, की तपास यंत्रणा या प्रकरणाचा संपूर्ण तपास करतील आणि मला न्याय मिळवू देतील. माझा तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे. तसेच याबाबत आज खटला दाखल झाल्याने मी आज जास्त काही बोलणार नाही, मात्र माझी कायदेशीर टीम काम करत असून पुढील एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत कागदपत्रांसह सविस्तर बाजू मांडू असेही कुचिक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.