काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याजवळ खडकवासला येथे पदाधिकारी-सदस्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या मंथनातून पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आणि काँग्रेसचा हा ‘फोर्स’ पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे क्रांतिदिन आणि स्वातंत्र्यदिन यांच्यामध्ये ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्यात प्रदेश काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांसाठी विशेष राज्यव्यापी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे ३००हून अधिक काँग्रेस नेते व प्रदेश पदाधिकारी यांच्या दृष्टीने हे जणू ‘मंतरलेले दिवस’ बनले.
राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्वधर्म समभाव आणि सामाजिक समता या काँग्रेस पक्षाच्या पायाभूत विचारांच्या शिदोरी बरोबरच, प्रचलित राजकारण, संघटनात्मक बांधणी, मतदार याद्यांची पडताळणी, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, जातीनिहाय जनगणना, सांस्कृतिक राजकारण, रचितकथनाची (नॅरेटीव्ह) निर्मिती इत्यादी विषयांवरील मान्यवरांनी केलेल्या प्रबोधनाचीही भर पडली. या वैचारिक मंथनातून निर्माण झालेले चैतन्य ही या राज्यव्यापी कार्यशाळेची फार मोठी फलश्रुती मानावी लागेल.
काँग्रेसचे नवी दिल्लीत दीर्घकाळ पक्षाचे कार्य करणारे ज्येष्ठ मुत्सद्दी नेते हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली ही गोष्ट सुमारे सहा महिन्यांपूर्वीची! सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक दौरे केले. नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटले. महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक परिस्थिती, बलस्थाने आणि आव्हाने समजून घेतली. नवीन कार्यकारिणी घोषित झाली आणि सुमारे १५ दिवसांपूर्वी राज्यव्यापी बैठक घेण्याचे ठरले. मात्र एवढे मोठ्या कार्यकारिणीची बैठक घेण्यापेक्षा कार्यशाळा घेऊ, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यातूनच पुण्यात कार्यशाळा घेण्याच्या कल्पनेचा जन्म झाला. प्रदेश काँग्रेसच्या खजिनदारपदाची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. मुंबईत मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या मनातील दोन दिवसांच्या कार्यशाळेचा विचार त्यांनी बोलून दाखवला. उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्याशीही चर्चा झाली आणि आम्ही जागा बघायला सुरुवात केली.
त्यामध्ये आळंदी हे स्थान निश्चित केले. धर्मशाळाही निश्चित केली. मात्र अनेकांना त्या तारखा सोयीच्या नव्हत्या, त्यामुळे पुण्याची निवड आणि ११ व १२ ऑगस्ट या सर्वांना सोयीच्या तारखा निश्चित केल्या गेल्या. माझ्यासह गणेश पाटील व निवडक पदाधिकाऱ्यांनी जागेची व व्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त केल्यावर नियोजनास गती आली.
पुण्यासारख्या मध्यवर्ती शहरात ही राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्याचे निश्चित झाले, विषय निश्चित झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत, पक्षाचे माध्यम प्रमुख व प्रवक्ते पवन खेरा, विश्वजित कदम, नितीन राऊत, अमित देशमुख, संजय आवटे, निरंजन टकले, सचिन राव, उल्हास पवार अशा असंख्य मार्गदर्शकांची नावे वक्ते म्हणून निश्चिती झाली. ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकले नाही. निमंत्रणे गेली आणि गावोगावचे नेते व पदाधिकारी पुण्यात पोहोचू लागले. येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अमाप उत्साह दिसून येत होता.
या कार्यशाळेसाठी प्रत्येकाने नोंदणी फी आनंदाने भरली. प्रत्येक सहभागीस महात्मा गांधींच्या जीवनाचे पैलू, काँग्रेसची वैचारिक परंपरा, देशापुढील आव्हाने अशा विषयांवरील पुस्तके व राज्यघटनेची छोटी प्रत यांचा संच भेट देण्यात आला. काही प्रकाशकांची पुस्तके विक्रीसही ठेवण्यात आली होती. त्यासही मोठा प्रतिसाद भला. प्रदेश काँग्रेसच्या महिला सदस्यांपैकी ९० टक्के महिला सहभागी झाल्या होत्या हे विशेष.
तसेच नव्या प्रदेश कार्यकारिणीत निम्म्याहून अधिक नवे तरुण पदाधिकारी होते, त्यांची उपस्थितीही मोठी होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्येकाशी संवाद साधून प्रत्येक जिल्ह्यातील पक्ष संघटना, जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न आदींबाबत सविस्तर माहिती घेऊन कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल याचा कल जाणून घेतला. जुने-नवे पदाधिकारी, नव्या ओळखी यामुळे एकोपा दृढ होत राहिला. पुढे दोन दिवस याचे प्रत्यंतर येत राहिले.
११ ऑगस्ट रोजी सकाळी ध्यानसाधना झाल्यानंतर, ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले आणि कार्यशाळेस खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. विस्तीर्ण हॉलमध्ये काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचा पत्रकार परिषद एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आली. त्यानंतर दोन्ही दिवस विविध सत्रांमध्ये उद्बोधक व्याख्याने होत राहिली.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावर सुप्रिया श्रीनेत, सामाजिक न्याय व जात जनगणना या विषयावर सचिन राव, सांस्कृतिक राजकारणावर संभाजी भगत, सामाजिक राजकीय आव्हाने या विषयावर निरंजन टकले, प्रशासन आणि कार्यकर्ता यावर महेश झगडे, रचितकथनाची निर्मिती या विषयावर पवन खेरा, गांधी-नेहरू-आंबेडकर या विषयावर संजय आवटे यांची व्याख्याने झाली.
तसेच, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम आदींचे मार्गदर्शन, पाठोपाठ होणारी चर्चासत्रे यातून प्रत्येकजण वैचारिक समृद्ध होत राहिला. विशेष कविसंमेलनही झाले. त्यामध्ये ज्ञानेश वाकुडकर या कवींनी सादर केलेल्या कवितांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेच, शिवाय अंतर्मुखही केले.
दोन दिवसांच्या या कार्यशाळेचा समारोप झाला. आपापल्या गावी परतण्याची घाई असूनही प्रत्येक जण रेंगाळत राहिला. ‘आमच्या जिल्ह्यात या’ असे निमंत्रण एकमेकांना देत राहिला. ज्येष्ठ विजय वडेट्टीवार यांनी या राज्यस्तरीय कार्यशाळेचे फलित सांगताना म्हटले की, ‘बऱ्याच वर्षानंतर मी अशी कार्यशाळा बघितली.
राज्यातील पक्षनेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कनेक्टीव्हिटी वाढवून प्रभावी ‘फोर्स’ तयार झाला, हे फार मोठे फलित मी या राज्यव्यापी कार्यशाळेचे मानतो. संत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील ‘गुरुकुंज भजनी मंडळा’तर्फे दोन दिवसांचे ध्यान व प्रार्थनासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यातून एक नवीन चैतन्य निर्माण झाले. समाजात एकोपा निर्माण करीत केलेल्या समाज बांधणीच्या आठवणी त्यामुळे कार्यशाळेतील सर्वांनाच वेगळी अनुभूती मिळाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सहा महिन्यांच्या कारकिर्दीतील कामगिरीवर आधारित पुस्तिकाही प्रकाशित केली गेली.
दोन दिवसांच्या या कार्यशाळेचे उद्घाटन व दुसऱ्या दिवशीचा समारोप; तसेच ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची पत्रकार परिषद यासाठी माध्यम प्रतिनिधी आणि व चॅनेल यांनी गर्दी केली होती. विविध सत्रातील व्याख्याने व भाषणे याचे वार्तांकन करून छायाचित्रांसह संपूर्ण महाराष्ट्रातील माध्यमांना पाठवण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याच्या बातम्या ठळकपणे येत राहिल्या, ही समाधानाची बाब आहे.
पुण्यात युवक काँग्रेसच्या माध्यमातून कामास सुरुवात केल्यानंतर पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस अशा विविध पदांवर मी दीर्घकाळ काम केले. आता प्रदेश काँग्रेस खजिनदारपदाची धुरा माझ्याकडे सोपवण्यात आल्यानंतर लगेचच पुण्यातील या राज्यव्यापी कार्यशाळेची जबाबदारी माझ्यासह प्रदेश पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली आणि ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वजण झटत राहिलो.
उत्तम समन्वयामुळे हा कार्यशाळा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. माझ्या दृष्टीनेही हे ‘मंतरलेले दिवसच’ होते. ही कार्यशाळा यशस्वी झाली ही भावना माझ्यापाशी अनेकांनी व्यक्त केली. तेव्हाच मनात जाणीव झाली की काँग्रेसचा मध्यवर्ती ‘फोर्स’ आता पूर्ण चार्ज होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ व अन्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही राज्यव्यापी कार्यशाळा काँग्रेस पक्षाच्या आगामी विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास आहे.
कार्यशाळेसाठी निवडलेली खडकवासल्याच्या पायथ्याशी असणारी सोरिना रिसोर्टची जागा सर्व दृष्टीने परिपूर्ण होती. तेथेच सर्व व्यवस्था करण्यात आली. पुण्यापासून काहीसे दूर निसर्गरम्य टेकडी परिसरातील या रिसोर्टमध्ये ३००हून अधिक व्यक्तींची निवासाची व्यवस्था होती. उत्तम नाष्टा व शाकाहारी भोजन, शुद्ध पाणी, बैठकांसाठी मोठे हॉल, विस्तीर्ण पार्किंग, हिरवळ आणि मोबाइलला असणारी रेंज या सर्वांमुळे दोन दिवसांच्या या कार्यशाळेसाठी ही जागा अगदी योग्य ठरली.
या दोन दिवसांच्या कार्यशाळेत ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेवर भर देतानाच अन्य अनेक विषयांवर भर देण्याचेही ठरले होते. लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्याला सामोरे जाताना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया यांचा प्रभावी वापर करीत जनतेचे प्रश्न हाती घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा विचार नक्की झाला. त्यामुळे विविध वक्त्यांनी दिलेली माहिती व केलेले विवेचन यामुळे कार्यकर्त्यांशी थेट संवाद निर्माण होऊन त्यांचे प्रशिक्षणही होते व वैचारिक बैठकही भक्कम होते. त्या दृष्टीने वक्ते व विषयांची निवड नक्की करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.