नवाब मलिक  सरकारनामा
महाराष्ट्र

नवाब मलिकांनी टि्वट केलेल्या फोटोतील व्यक्ती कोण?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याबाबत दररोज नवीन खुलासे करीत आहेत. मलिक यांनी आता आणखी एक फोटो टि्वट केला आहे. या फोटोतील व्यक्ती कोण असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे, त्यांची बहिण वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. यास्मिन वानखेडे यांचे अब्दुल अझिज खान यांच्यासोबत लग्न झाले होते. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहनाम्यावर अब्दुल अझीज यांचे नाव आहे. मलिक यांनी टि्वट केलेला फोटो हा अब्दुल अझिज यांचा असल्याचे समजते. यास्मिन वानखेडे यांनी ओळख लपविण्यासाठी अब्दुल अझिजसोबत घटस्फोट घेतल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

यास्मिन वकील आहेत. त्या मनसेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षा असून मनसेचं कायदेशीर कामही पाहतात. तसेच त्या महिलांच्या विविध समस्या सोडवण्याचेही काम करतात, अशी माहिती यास्मिन वानखेडे यांनी दिली होती.नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सुरुच ठेवले आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी लाटल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी वानखेडेंचे बर्थ सर्टिफिकेट, त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो, निकाहनामा, त्यांचे काही कौटुंबिक फोटो प्रसिद्ध केले आहेत.

यास्मिन वानखेडे (Yasmin Wankhede) यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. तसेच मलिकांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. एका महिलेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची मागणी यास्मिन यांनी पत्र लिहून राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. एका नोकरदार माणसाच्या जन्म प्रमाणपत्राबाबत शोध घेणारे नवाब मलिक कोण आहेत? त्यांची रिसर्च टीम दुबईपासून मुंबईपर्यंत आमचे फोटो पोस्ट करत आहेत. मलिकांनी खोटे आरोप करत आमची बदनामी केली असून आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे असे आरोप यास्मिन यांनी केले आहेत.

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सातत्याने एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. या प्रकरणात आता समीर वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी क्लिनचिट दिली आहे.

समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी आज राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला आहे. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली आहे. हलदर म्हणाले की, मी त्यांची तक्रार पाहिली आहे. मला वाटते की ते अनुसूचित जातीमधील असावेत. धर्मांतर केल्याचे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT