Mumbai News : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटायला एक जागा आली आहे. या एकमेव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून जवळपास 75 जण इच्छुक होते. त्यामुळे पहिल्यांदाच मोठी रस्सीखेच दिसून येत होती. त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच उमेदवाराची निवड करण्यात आली. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडीकडे लागले होते. या निवडीसाठी कोअर कमिटीच्या जवळपास तीन बैठका पार पडल्या. त्यामुळे जोरदार रस्सीखेच दिसत होती. त्यानंतर त्यांच्या कोट्यातील एकमेव जागेसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकींना उमेदवारी दिली आहे. सिद्दीकींना उमेदवारी देताना विधानपरिषद उमेदवारीत प्रफुल्ल पटेलांची सरशी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोडून अजितदादा यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये (NCP) आल्याने वांद्रे मतदारसंघातून झिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून झिशान सिद्दीकी विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी आग्रही होते. त्यांना अजितदादांकडे देखील मागणी लावून धरली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafull patel)आणि बाबा सिद्दीकी हे जुने मित्र होते. प्रफुल्ल पटेल यांनीच सिद्दीकी यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले होते. 10 फेब्रुवारी 2024 ला बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेससोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी माध्यमाशी बोलताना स्वतः बाबा सिद्दीकी यांनी पक्षप्रवेशाचे क्रेडिट प्रफुल्ल पटेल यांना दिले होते. झिशान यांच्या उमेदवारीसाठीही प्रफुल्ल पटेलच आग्रही होते, अशी माहिती आहे.
प्रफुल्ल पटेल यांनीच कोअर कमिटीच्या बैठकीत झिशान यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. त्यामुळेच झिशान यांच्या नावावर बैठकीत एकमत झाले. दुसरीकडे याच बैठकीत पार्थ पवार यांनी भाजप नेते संजय काकडे यांच्या चिरंजीव विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर नेतेमंडळीमध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे त्यांचे नाव काहीसे मागे पडले होते.
त्यातच या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांचे नाव चर्चेत आणले होते. मात्र, तटकरे यांना आगामी काळात होत असलेल्या रायगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील 'कोकण'मार्गे आमदारकीचा शब्द त्यांनी घेतला आहे.
दुसरीकडे या उमेदवारीच्या शर्यतीत शेवटपर्यंत चर्चेत असलेले माजी खासदार आनंद परांजपे, सुरेशदाजी बिराजदार व उमेश पाटील यांचे नाव मात्र चर्चेत होते. त्यांना यावेळेस देखील विधान परिषदेवर संधी मिळाली नाही. दुसरीकडे मात्र या एकमेव जागेसाठी उमेदवारीत प्रफुल्ल पटेलांची सरशी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.