Jawoli Panchayat samiti Sabhapati Jayshri Giri
Jawoli Panchayat samiti Sabhapati Jayshri Giri 
महिला

वाढदिनी जावळीच्या सभापतींनी केली 15 गुंठे जागा ग्रामपंचायतीला दान 

प्रशांत गुजर

सायगाव (ता. जावळी) : राजकीय आणि सामाजिक जीवनात अनेक जण वाढदिवस साजरे करतात व लाखो रुपये खर्चही करतात. मात्र, आपल्या दानशूर वृत्तीने प्रसिद्ध असलेल्या जावळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री मणिलाल गिरी यांनी मात्र आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिगांव (ता. जावळी) येथे नवीन आरोग्य उपकेंद्र तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी स्वमालकीची 15 गुंठे जागा महिगाव ग्रामपंचायतीच्या नावे करून अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. जागेचा नोंदणी दस्त गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्याकडे सुपूर्द केला. 

हल्ली वाढदिवस म्हटले की मोठा गाजावाजा असतो. राजकीय नेत्यांच्या वाढदिवशी तर मोठी धामधूम बघायला मिळते. जावळीच्या सभापती गिरी यांचा नुकताच वाढदिवस झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केवळ दूरध्वनीवरच शुभेच्छांचा स्वीकार केला. गेली अनेक वर्षे महिगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व सायगाव येथे खासगी जागेत असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याला जागा उपलब्ध होत नव्हती.

त्यामुळे माणसांच्या आणि पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आज लोक गुंठ्या गुंठ्यासाठी भांडत बसतात तर गावासाठी एवढी जागा फुकट कोण देणार? 
मात्र, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा विचार करून अध्यात्माचा आणि वारकरी सांप्रदायाचा वारसा असणाऱ्या सभापती जयश्री गिरी व त्यांचे पती माजी सभापती सुहास गिरी यांनी निर्णय घेऊन भागातील जनतेला व पशुधनाला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आपल्या मालकीची 15 गुंठे जागा शासनाच्या नावे करून देत आपले दातृत्व दाखवून दिले.

सभापती गिरी यांच्या या दातृत्वाबद्दल तालुक्‍यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, दुय्यम निबंधक बर्गे, ग्रामपंचायत महिगावचे प्रशासक मासाळ, सागर पवार, किशोर पवार, अमित भोसले, सुनिल पवार, अभिषेक जगदाळे, विलास पवार, राजेंद्र माने, दत्तात्रय सुर्वे, श्री. पोफळे, संजय शेलाटकर, अमर जंगम, महेश पवार, सुनिल फरांदे, दत्तात्रय फरांदे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT