Kardile Daughter Campaigning
Kardile Daughter Campaigning 
महिला

आमदार कर्डिलेंची लेक म्हणते 'वडिलांचे नव्हे, लेकीचेच ऐका'

सरकारनामा ब्युरो

नगर : "बंधू-भगिणींनो, माझ्या वडिलांचे ऐकू नका. लेकीचेच ऐका. माझ्या पतीला विजयी करा,''अशी हाक आपल्या माहेरच्यांना देत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पत्नी नगरसेविका शितल जगताप यांनी बुऱ्हाणनगरमध्ये प्रचार केला. शितल यांचे वडील असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. हा प्रचार जावई जगताप यांच्या विरोधात आहे. त्यामुळे लेक शितल त्यांच्या वडीलांच्या विरोधात जावून माहेरच्या गावात पतीच्या विजयासाठी साकडे घालत आहे.

शीतल जगताप यांनी काल जेऊर गटातील मतदारांशी संवाद साधला. शीतल यांचे माहेर असलेल्या व आमदार कर्डिले यांच्या बालेकिल्ल्यातच शीतल यांनी आमदार जगताप यांच्यासाठी केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला. या दौऱ्यात शीतल यांनी महिला, तरुण व शेतकऱ्यांना संग्राम यांना मतदानाचे आवाहन केले. बुऱ्हाणनगरचे ग्रामदैवत देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन शीतल यांनी गावातून प्रचारफेरीस प्रारंभ केला. गावातून काढलेल्या प्रचारफेरीत त्यांनी सरपंच, उपसरपंच यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला व ज्येष्ठांशी संवाद केला. आमदार संग्राम जगताप यांच्या कार्याचा आणि भविष्यातील विकासासाठीच्या योजनांची त्यांनी माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी जेऊर गटातील शेंडी, कापूरवाडी, नागरदेवळे, पोखर्डी, पिंपळगाव माळवी, ससेवाडी, जेऊर आदी गावांत प्रचार दौरा केला. रात्री उशिरा पिंपळगाव उज्जैनी येथे या दौऱ्याचा शेवट झाला. गावागावांत, तसेच वाड्या-वस्त्यांवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
जगताप यांनी जनावरांच्या छावण्यांमधील शेतकऱ्यांशीही हितगूज केले. छावण्यांमधील सुविधा व पाण्याबाबत त्यांनी चौकशी केली. बुऱ्हाणनगर माहेर असल्याने ग्रामस्थ महिलांनी त्यांची आस्थेने चौकशी केली आणि आपुलकीने संवाद साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT