navneet-rana supports Telangan police about encounter of rapists
navneet-rana supports Telangan police about encounter of rapists 
महिला

तेलंगणा पोलिसांनी केलेले 'ते' एन्काऊंटर योग्यच : नवनीत राणा

सरकारनामा

दिल्ली :  तेलंगणा   पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींचे केलेले एन्काऊंटर योग्यच आहे . या एन्काऊंटर   चे मी समर्थन करते ,असे खासदार नवनीत राणा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


हैदराबाद येथे घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या ,बलात्कार प्रकरणातील आरोपींना एन्काऊंटर   मध्ये ठार करून तेलंगणा पोलिसांनी देशात नवीन सुरुवात केली आहे.  प्रत्येक बलात्कार प्रकरणात असेच झाले पाहिजे.  महिलांवर अत्याचार करणारे, त्यांना जाळण्याचा प्रयत्न करणारे आणि महिलांना  ठार मारणाऱ्यावर  अशीच कारवाई झाली पाहिजे . यावर फार चर्चा नको . अशा आरोपींना कोर्टात आणून फाशीची शिक्षा व्हावी ,असे मला वाटते. 


खासदार नवनीत राणा पुढे म्हणाल्या ,  देशात बलात्काराच्या घटना वाढत आहेत.  कधी तीन वर्षाच्या मुलीवर तर कधी सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची प्रकार आपण ऐकतो.  अशा प्रकारांना आळा घालायचा असेल तर अशीच कारवाई होणे आवश्यक आहे.  कायद्याविषयी मला आदर आहे, परंतु तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कारवाईचाही मी  आदरच  करते. 


आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा होणे बरोबर आहे आहे की पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेली कारवाई योग्य आहे  असे विचारले असता   नवनीत राणा म्हणाल्या,  तेलंगणा पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली आहे .  बलात्कारी आरोपी त्यांच्या तावडीतून पळून जात असतील तर त्यांना ठार करणे हा  पोलिसांचे अधिकार आहे.  मी देखील एक आई आणि एक मुलगी आहे. मी सुद्धा  जर तिथे असते तर एक आई म्हणून  मी सुद्धा या गुन्हेगारांचे असेच  एन्काऊंटर केले असते. 


नवनीत राणा पुढे म्हणाल्या ,न्याय व्यवस्थेविषयी मला संपूर्ण आदर आहे.  मात्र दिल्लीमध्ये निर्भया केस प्रकरणात काय झाले ? गेली सात-आठ वर्षे निर्भयाचे कुटुंबिय न्याय मागत आहेत.  न्यायालयाचे उंबरठे ते झिजवीत आहेत.  दिवस जात आहेत ,  वर्षे जात आहेत , परंतु अजूनही आरोपींना फाशी झालेली नाही. 


नवनीत राणा पुढे म्हणाल्या ,  मी गृहमंत्र्यांकडे अशी मागणी करते की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी  फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावे .  बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला एका महिन्यांमध्ये शिक्षा दिली गेली पाहिजे . अशी व्यवस्था करण्यात यावी . त्यासाठी  कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात यावी असे मला वाटते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT