Vaishali Nagawde Demands MLC Seat for Daund
Vaishali Nagawde Demands MLC Seat for Daund 
महिला

विधान परिषदेत दौंडला संधी हवी : वैशाली नागवडेंची मागणी

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : पक्षनिष्ठ महिला आणि ग्रामीण चेहरा म्हणून पक्षाकडे विधान परिषदेची उमेदवारी मागितली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, पण दौंड तालुक्याला संधी मिळायला हवी, अशी इच्छा पुणे जिल्हा राष्ट्रवादी माहिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी व्यक्त केली आहे. 

राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी आवश्यक असलेल्या सहकार व स्वयंसेवी संस्थेचा अनुभव या निकषात बसत असल्याने पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उप मुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे वैशाली नागवडे यांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सदैव पक्षनिष्ठ म्हणून त्या काम करीत आहेत. उप मुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या गटांमध्ये काम करताना असताना त्यांच्यावर कोणत्याही गटाचा शिक्का नसून पक्ष पदाधिकारी म्हणून त्या परिचित आहेत. 

वैशाली नागवडे या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या संचालिका म्हणून काम पाहिले आहे. २००७ ते २०१२ या कालावधीत त्या दौंड पंचायत समिती सदस्या होत्या. २००९ मध्ये त्यांनी राज्य शासनाच्या पंचायत राज समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. २००५ ते २०१६ या कालावधीत त्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) संचालिका होत्या तर २०१३ ते २०१६ या कालावधीत त्यांनी महानंदचे अध्यक्षपद भूषविले आहे. २०१३ मध्ये त्यांची नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) संचालिका म्हणून नियुक्ती झाली होती. त्याशिवाय उत्तर प्रदेश मधील बरेली स्थित इंडियन वेटरिनरी रिसर्च इंस्टिट्यूटच्या संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 

सामाजिक कार्य

शरद मल्हार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा या नात्याने मागील १५ वर्षापासून वैशाली नागवडे या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी समूह लोकनृत्य व समूह गीत स्पर्धांचे आयोजन करीत आहेत. या महोत्सवात जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांमधील महिलांचे संघटन करण्यासह त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. त्याचबरोबर प्रतिभा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू आहे.

दौंडला संधी हवी

दौंड तालुक्यातून माजी आमदार रमेश थोरात हे इच्छुक असताना उमेदवारी संबंधी विचारले असता वैशाली नागवडे म्हणाल्या, ''पक्षनिष्ठ महिला आणि ग्रामीण चेहरा म्हणून पक्षाकडे विधान परिषदेची उमेदवारी मागितली आहे. रमेश थोरात यांना उमेदवारी मिळाली तरी माझी हरकत नाही. दौंड तालुक्याला संधी मिळायला हवी,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT