shivsena-corporator-donatio
shivsena-corporator-donatio 
महिला

मराठी शाळा वाचविण्यासाठी नगरसेविकेचे भाषण नाही चक्क देणगी !

कृष्णा जोशी

मुंबई :  मराठी शाळा वाचविण्यासाठी केवळ भाषणे देणारे नगरसेवक आपल्याला गावोगावी दिसतात पण शाळा वाचवण्यासाठी पदरमोड करणारे नगरसेवक दिसत नाहीत .

घटत चाललेली विद्यार्थीसंख्या आणि निधीची कमतरता यामुळे मेटाकुटीला आलेल्या मराठी शाळांना वाचविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बोरीवलीच्या शिवसेना नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी तेथील अभिनव विद्यामंदिर या शाळेला एक लाख 91 हजारांचा निधी दिला आहे. 

मराठी शाळा वाचविण्यासाठी तसेच त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी-टिकविण्यासाठी, या शाळांना मोठ्या इंग्रजी शाळांच्या तोडीसतोड सोयी मिळाव्यात यासाठी पुष्कळ व्यक्ती, स्वयंसेवी संस्था व शाळा यांचे आपापल्या परीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र शासकीय मदतीअभावी यापैकी काही प्रयत्नांवर मर्यादा येत आहेत तर काही प्रयत्नांमुळे या शाळांची स्थिती सुधारल्याचीही कित्येक उदाहरणे आहेत. अशावेळी आपण सर्वांनीच मराठी शाळांसाठी खारीचा वाटा उचलला तर हे अवघड शिवधनुष्य नक्कीच उचलता येईल, असा संदेश देण्यासाठी खुरसंगे यांनी हा निधी दिला. 

रिद्धी खुरसंगे यांची पती व माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे हे या शाळेच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खेळाचे आणि व्यायामाचे साहित्य आणायचे होते, मात्र त्यासाठी एक लाख 91 हजार रुपये लागणार होते. शाळेकडे एवढा निधी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे ही बाब खुरसंगे दांपत्याला कळल्यावर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा निधी शाळेला दिला. 

हे दांपत्य दरवर्षी किमान पंचाहत्तर शालेय मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करते. हल्ली मराठी शाळांमध्ये विद्यार्थी येत नाहीत, जे येतात ते कनिष्ठ आर्थिक स्तरातील असल्याने फी भरत नाहीत. शाळांना वेतन अनुदान मिळते पण अन्य खर्चासाठी अनुदान मिळत नाही. त्यामुळे शाळा कशा चालवाव्यात हा प्रश्‍न आहे, त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याने आपण हा निधी दिला, असे भास्कर खुरसंगे यांनी सकाळ ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT