ST in Trouble due to Corona
ST in Trouble due to Corona 
मंत्रालय

#CoronaEffect घटली लालपरीच्या प्रवाशांची संख्या

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील 'कोरोना'च्या भितीने रेल्वे प्रवाशांमध्ये 15 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळालाही दररोज दहा लाखांपर्यंत फटका सोसावा लागत आहे. प्रवाशांअभावी दररोज हजारो फेऱ्या रद्द करण्यात येत असून प्रवासी नसतील तर गाड्या जागेवरच थांबवा, असे आदेश महामंडळाने विभाग नियंत्रकांना दिले आहेत.

दोन लाखांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संसार सांभाळणारी लालपरी विविध आंदोलने, मोर्चे, अपघात यासह अन्य कारणांमुळे घटलेल्या प्रवासी संख्येमुळे अडचणीत सापडली आहे. त्यात आता कोरोनाची भर पडली असून या आजाराच्या भितीने नागरिक पुणे, मुंबई, नगर, नागपूर, सोलापूर अशा ठिकाणचा प्रवास टाळत असल्याचे चित्र आहे. ज्या भागात कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळला, त्याठिकाणी जाणाऱ्या बसमधील प्रवाशांची संख्या खूपच कमी असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांअभावी दररोज अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत असल्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे.

पुणे, मुंबई, नागपूर, नगर या जिल्ह्यांमध्ये कोरोना या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातही भितीचे वातावरण असल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. गावोगावच्या यात्राही बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांची संख्या क्षमतेपेक्षा कमी असल्यास गाड्या रद्द करा, असे आदेश विभाग नियंत्रकांना दिले आहेत - राहूल तोरो, वाहतूक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

परिवहनमंत्र्यांच्या विषेश मोहिमेला स्थगिती

परिवहनमंत्री अनिल परब यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागांना उत्पन्न वाढीचे टार्गेट दिले होते. 1 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत उत्पन्न वाढवा ही विशेष मोहीम राज्यभर राबविण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या भितीने प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने उत्पन्नातही घट झाली आहे. दरम्यान, उत्पन्नात मागे असलेल्या विभागांमधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही परिवहनमंत्र्यांनी दिला होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या विशेष मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिल्याचे महामंडळातील सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT