mangalprabhat lodha
mangalprabhat lodha 
माझी वाटचाल

मुंबईतील श्रीमंत आमदार मंगलप्रभात लोढांची राजकीय कारकिर्द अशी घडली....

शब्दांकन : कृष्णा जोशी

मी लहानपणापासून राजस्थानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेलो होतो. जोधपूरमध्ये महाविद्यालयीन जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून नवनिर्माण आंदोलनातही सहभाग घेतला. एलएलबी करून सनद घेतल्यावर तेथे उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. पण नंतर वडील उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्यावर तेथेच आपण वकिली करणे योग्य दिसणार नाही हे पाहून मुंबईत आलो.

 
मुंबईत आधी राजकारणापासून दूरच होतो, चार वर्षे एका खासगी रिअल इस्टेट फर्ममध्ये नोकरी केली, नंतर बिल्डिंग मटेरियल पुरवण्याचा व्यवसाय सुरु केला. मग 1982 च्या सुमारास एका मित्राच्या मध्यस्थीने नालासोपारा येथे जमिन खरेदीविक्री चा व्यवसाय सुरु केला व त्यात जम बसत गेला. या काळात 1990 पर्यंत मी भायखळ्यात रहात होतो व राजकारणात अजिबात सक्रीय नव्हतो. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रामजन्मभूमी आंदोलनात रथयात्रा काढल्याने मी त्याकडे आकर्षित झालो व पुन्हा संघाचे कामही सुरु केले.

संघाचे ज्येष्ठ प्रचारक शेषाद्री चारी यांनी मला या आंदोलनात मलबार हिल विभागाची जबाबदारी सोपवली. तेथे काम सुरु केल्यावर मी कारसेवेसाठी अयोध्येलाही गेलो, तेथे अटकही झाली. 1993 मध्ये चारीजी भाजप मध्ये संघटनमंत्री झाले होते, त्यांनी मला पक्षाचीही जबाबदारी दिली व अशा प्रकारे पक्षाचे काम सुरु केले. 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 1995 मध्ये मलबारहिल मधून भाजपकडे कोणीही सक्षम उमेदवार नव्हता. काँग्रेसचे नगरविकास मंत्री बलाढ्य बी. ए. देसाई तेथून निवडून येत असत, त्यांच्यापुढे अन्य उमेदवारांना विजयाची शक्यताही नव्हती. मला उमेदवारी मिळाल्यावर मी तशाही परिस्थितीत निकराची लढत दिली व मी जिंकूनही आलो. माझ्या विजयाचे मुख्य कारण म्हणजे देसाई हे पराभूत व्हावेत अशी तेथील बहुतेकांची इच्छा होती. म्हणून मला मिळालेली ती नकारात्मक मते व रामजन्मभूमी आंदोलनाची लाट या बळावर मी निवडूनही आलो. अन्यथा माझे तेथे म्हणावे असे भरीव कामही नव्हते व कोणी मला फारसे ओळखतही नव्हते, तरी मी जेमतेम आठशे मतांनी जिंकलो. माझा विजय निश्चित झाल्यावर रात्री नऊ वाजता मतमोजणी केंद्रात बी. ए. देसाई माझ्या वडिलांना म्हणाले की मलबार हिल मध्ये भाजपचा विजय होतो याचा अर्थ साऱ्या मुंबईतच पक्ष जिंकला असणार. त्यांचे उद्गार खरे ठरल्याचे आम्हाला तेथून बाहेर गेल्यावर कळले, केवळ मुंबईतच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रात बहुमत मिळवून सेना-भाजप युती सत्तेवर आली होती. 

अर्थात त्यावेळी मतदारसंघात माझे फारसे सामाजिक भरीव काम नव्हते, तरी नंतर मी तेथे प्रचंड कामे केली, लोकांचा विश्वास संपादन केला व त्यामुळे मी कधीच मागे वळून पाहिले नाही. या मतदारसंघातून माझा कधीच पराभव झाला नाही व तेथून मी सतत पाच-सहा वेळा वाढत्या मताधिक्याने निवडून येत राहिलो. यावेळी मला ७३ हजारांचे मताधिक्य मिळाले. नंतर मिळालेल्या या विजयात पक्षाचा करिष्मा होता, तसेच माझ्याही कामांचा मोठा वाटा होता. निवृत्तीनंतर माझे वडील आमदार झाले, विरोधीपक्षनेते झाले, खासदार झाले, तरी मी कधी राजकारणात जाईन असे वाटले नव्हते.

सार्वजनिक जीवनात माझी पहिली निवडणूक वगळता फारसे कधी कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागले नाही. एकच प्रतिकूल आठवण आहे, मलबार हिल वरील हँगिंग गार्डन परिसरातून खाली चौपाटीला जाणारा रस्ता करावा असा माझा प्रस्ताव होता. त्याने वाहनचालकांचा खूप मोठा वळसा वाचला असता, पण या प्रस्तावाला लोकांनी पर्यावरणाच्या नावाखाली विरोध केला. आता त्या ठिकाणी झोपडपट्टी आली आहे. असो. आता मला मुंबई भाजपचे अध्यक्षपदही मिळाले, पण मागे वळून पाहताना जाणवते की शेषाद्री चारी यांनी मला रामजन्मभूमी आंदोलनात जी जबाबदारी दिली तोच माझ्या राजकीय जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. अन्यथा मी व्यावसायिकच राहिलो असतो.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT