Arun Lad Chandrakant Patil
Arun Lad Chandrakant Patil 
मुलाखती

माझ्या विजयात चंद्रकांतदादांचा मोठा वाटा : अरुण लाड (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो

पुणे : माझ्या विजयात चंद्रकात पाटील यांचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनी दोन वेळा या मतदारसंघातून निवडून येऊनही पदवीधरांसाठी काहीही काम केले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पदवीधरांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले, अशी प्रतिक्रिया पुणे पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी- महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी आपल्या विजयाबाबत बोलताना व्यक्त केली.

विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार या मतदारसंघातून निवडून आले आहेत. या विजयाबाबत बोलताना लाड म्हणाले, "गेल्या वेळी मी एकटा होतो. या वेळी घटक पक्ष सोबत होते. तिन्ही पक्षांनी हयगय केली नाही. आम्ही इतके दिवस लक्ष देत नव्हतो. त्यामुळे या मतदारसंघावर आपला मालकी हक्क आहे, असे भाजपला वाटत होते. परंतु, यावेळी आम्ही खेडोपाडी गेलो. म्हणून आम्हाला यश मिळवता आले,''

ते पुढे म्हणाले, "मला ही संधी चंद्रकांत दादांमुळेच मिळाली. माझे राहिलेले काम संग्राम देशमुख करतील, असे दादा दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. प्रत्यक्षात दादांनी कामच केले नव्हते. चंद्रकांतदादा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. गेल्या मंत्रीमंडळात ते दोन नंबरचे मंत्री होते. पण दोन वेळा निवडून येऊनही त्यांनी पदवीधर हा शब्दही काढला नाही. त्यामुळे युवकांचा व पदवीधरांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे सगळ्यांनी हा बदल घडवत महाविकास आघाडीकडून कामाची अपेक्षा व्यक्त केली आहे. ''

"हा माझा एकट्याचा विजय नाही. एकट्याने कुणी काही करु शकत नाही. हे महाविकास आघाडीचे यश आहे. जिद्दीने सगळेजण कामाला लागले होते. प्रचारासाठी ५ जिल्हे ५८ तालुके होते. प्रचारासाठी केवळ दोन आठवडे मिळाले होते. त्यातही महाविकास आघाडीच्या घरोघरी - गावोगावी जाऊन भूमीका समजावून सांगितली आणि मते मागितली. त्याचे फळ आम्हाला मिळाले,'' असेही लाड म्हणाले. मला साखर सम्राट कुणी म्हणू नये. मी संस्थेचा विश्वस्त आहे. आम्ही शेतकऱ्यांचे पैसे कधी बुडवले नाहीत. ऊसाचे उत्पन्न वाढवले ही काय आम्ही चूक केली काय. आम्ही साखर सम्राटाप्रमाणे वागत नाही, असेही लाड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT