मुलाखती

तुरुंगात टाका, गुन्हे दाखल करा पण आम्ही दारूची दुकाने फोडू, प्रसंगी जाळू - आमदार इम्तियाज जलील

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद झालेली दारूची दुकाने वाचवण्यासाठी काही राजकारणी मंडळी प्रयत्न करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शहरातील सर्व दारूची दुकाने बंद करण्याचा विडा उचलला आहे.

यासंदर्भात त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधल्यावर ते म्हणाले "धार्मिक स्थळ, शाळा, दवाखाने आदी परिसरात दारूची दुकाने असू नयेत हा नियम धाब्यावर बसवून शहरात दारूची दुकाने सर्रास सुरू आहेत. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाला यासंदर्भात निवेदन व वारंवार विनंती केली मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागला.

आम्ही कायदेशीर मार्गाने दारू बंदीसाठी मोहीम राबवणार आहोत. त्यानंतर पाच महिन्यांचा अवधी देऊ, तरीही दारू दुकाने बंद झाली नाही तर मात्र कितीही गुन्हे दाखल करा, तुरुंगात टाका पण दारूची दुकाने फोडली जातील, जाळली जातील. मात्र दारू बंदी होईपर्यंत उचललेलं पाऊल आम्ही कदापी मागे घेणार नाही अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी दारुविरोधातल्या आपल्या मोहिमेमागचा निर्धार व्यक्त केला. या आंदोलना विषयी त्यांनी सरकारनामाशी साधलेला हा विशेष संवाद. 

प्रश्‍न : दारू मुक्तीचा विषय तुम्हाला आताच का हातात घ्यावासा वाटला? 
उत्तर : कुठल्याही गोष्टीची योग्य वेळ यावी लागते. दारू बंदीच्या आंदोलनाबाबत (जलील या नशा मुक्ती आंदोलन असे संबोधतात) हेच घडले. माझ्या घरी काम करणाऱ्या मावशी त्यांच्या 16 व 14 वर्षाच्या मुलीला घेऊन रात्री 2 वाजता माझ्या घरी आल्या. प्रचंड घाबरल्या अवस्थेत पाहून काय झाले हे विचारले. तेव्हा त्यांनी नवरा दारू पिऊन मला, माझ्या दोन्ही मुलींना बेदम मारहाण करत असल्याचे सांगितले. हे ऐकून माझा संताप अनावर झाला, रात्रीच जाऊन मी तिच्या नवऱ्याला चोप दिला. तेव्हाच मनात विचार आला जे या महिलेच्या बाबतीत घडले ते समाजातील आणखी किती महिला व मुलीच्या बाबतीतही घडत असेल. त्याच क्षणी अशा लोकांसाठी काम करण्याचा निश्‍चय केला. 

प्रश्‍न : थेट दारूची दुकाने फोडणे, जाळणे योग्य आहे का? 
उत्तर : दारूबंदीचा हा लढा आम्ही कायदेशीर मार्गानेच सुरू केला. वार्डावार्डातील नागरिक व पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठका घेतल्या. शहागंजमध्ये जे दारू दुकान होते त्या भागात शाळा, मंदिर, मशीद, महापालिकेचा दवाखाना आहे. असं सगळं असताना हे दुकान सुरू होते. माहिती घेतली तेव्हा राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी देखील या दुकान मालकाने थेट मंत्रालयातूनच परवानगी आणल्याचे सांगितले. आम्ही संबंधित विभागाला निवेदन देऊन कारवाई करण्याची वारंवार मागणी केली. पण एखादा आमदार प्रश्‍न मांडत असेल तर त्याला किमान लेखी उत्तर तरी प्रशासनाकडून मिळायला हवे होते पण तेही मिळाले नाही. तेव्हा आम्ही शहागंज आणि चेलीपूरा भागात आंदोलन करत दारूचे दुकान फोडले. या प्रकरणात पोलिसांनी माझ्यासह कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. 

प्रश्‍न : लोकांचा पाठिंबा कसा मिळतोय? 
उत्तर : हा लढा हा विशिष्ट जाती किंवा धर्मासाठीचा नाही तर तो सामाजिक आहे. आतापर्यंत दारू विक्रेत्यांचे हित जपण्यासाठी अनेकजण पुढे आले असतील पण दारु विक्रेत्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणारा कदाचित मी पहिला आमदार असेल. लोकांसाठी स्वतःवर दरोड्या सारखे गंभीर गुन्हे दाखल होऊन देखील आम्ही मागे हटलो नाही. आसपासच्या खेड्यातील अनेक लोक व महिला मला आमच्या गावांत देखील दारुबंदीसाठी आंदोलन करा म्हणून भेटतायेत. यामुळे आम्ही योग्य दिशेने चाललो आहे याचीच ही पावती म्हणावी लागेल. 
प्रश्‍न : राजकीय स्टंट म्हणून तुमच्या आंदोलनाची हेटाळणी होतेय? 
उत्तर : देशाचा नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून वाईट प्रथांच्या विरोधात आवाज उठवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दारुबंदीचा हा लढा मी आमदार म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून हातात घेतला आहे. अनेकांचे दारु व्यावसायिकांशी हितसंबंध असतात. माझ्यावर टीका करणाऱ्यांचेही असू शकतील. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी एमआएमचा आमदार फक्त हिंदूची दारू दुकाने फोडतो असा आरोप माझ्यावर केला आहे. त्यांच्या या मानसिकतेची मला कीव येते. खैरे राहत असलेल्या वसंत भवन भागात अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान आहे, पण ते त्यांना बंद करता आले नाही. त्यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा या आंदोलनाचे नेतृत्व करावे मी त्यांच्या सोबत काम करायला तयार आहे. 

प्रश्‍न : सर्वोच्च न्यायालयाने पाचशे मीटरची अट घातली आहे ? 
उत्तर : राष्ट्रीय, राज्य महामार्गापासून दारूची दुकाने पाचशे व ग्रामीण भागात अडीचशे मीटरपासून लांब असावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हायवेवरील बंद दारू दुकाने शहरात घुसू पाहत आहेत. माझी नागरिकांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी याबाबत जागरूक राहून हे प्रयत्न हाणून पाडावेत. माझी मदत लागेल तेव्हा हाक द्या मी लगेच येईन. मुळात माझा लढा हा संपूर्ण दारूबंदीसाठी आहे. एका भागातील दुकान दुसऱ्या भागात गेल्याने प्रश्‍न सुटणार नाहीत. एकीकडे स्मार्ट सिटी करण्याच्या घोषणा सुरू आहेत, तेव्हा माझी मागणी त्या बरोबरच एक बेवडा सिटी देखील निर्माण करावी अशी आहे. एकाच ठिकाणी ही बेवडा सिटी उभारा आणि लोकांना दारू वाटा. 

प्रश्‍न : दारू बंदीमुळे सरकारचा महसूल बुडतो? 
उत्तर : आपल्या देशात नागरिकांवर विविध प्रकारचे कर लादले जातात. लोकही ते भरतात. स्वच्छतेचा कर तुम्ही घेतच आहात. मग समाजाच्या भल्यासाठी तुमचा काही महसूल बुडाला तर काय बिघडले? एवढीच महसुलाची चिंता असेल तर दारूबंदीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आणखी एखादा टॅक्‍स लावा, देशातील 99 टक्के लोक तो आनंदाने भरतील, पण दारू बंद झालीच पाहिजे. 

प्रश्‍न : शाळा बंद करून दारू दुकान सुरू करा अशी मागणी का ? 
उत्तर : शहागंज भागातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर झाकिर हुसेन शाळा आहे. त्याच इमारतीत खाली असलेल्या दुकानांमध्ये चक्क दारू दुकानाला परवाना देण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय परिसराच्या 100 मीटरमध्ये दारूच्या विक्रीला कायद्यानेच परवानगी नाही. मग हे दुकान सुरू कसे अशी विचारणा मी प्रशासकीय यंत्रणेकडे केली. पण त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही. शेवटी मी राज्यपालांना पत्र पाठवून शाळा बंद करून दारूचे दुकान सुरू ठेवा अशी मागणी केली, त्यात माझे काय चुकले. विधानसभेतही मी दारूबंदीच्या विरोधात आवाज उठवला आहे. 

प्रश्‍न : दारू बंदीच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? 
उत्तर : कायदा मोडायचा नाही हे मी ठरवले आहे, त्यामुळेच दारूमुळे त्रस्त असलेल्या भागात जाऊन बैठका घेणार. तेथील प्रामाणिक लोकांना सोबत घेऊन दारू दुकानांच्या विरोधात सह्याची मोहीम राबवली जाईल. या सह्याचे निवदेन जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाला देऊ. त्यावर तीन महिन्यात कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु आम्ही आमच्याकडून दोन महिन्याचा वाढीव कालावधी कारवाईसाठी देणार आहोत. म्हणजेच पाच महिन्यानंतरही काहीच पावले उचलली गेली नाही, तर मग पोलिसांना सांगून दुकाने फोडू. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT