Nitesh Rane and Manoj Jarange-Patil Sarkarnama
मुलाखती

Nitesh Rane News: जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार’ ; मराठा आरक्षणावर नितेश राणेंचा थेट इशारा

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नितेश राणेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केले. मराठा तरुणांवर अन्याय झाल्यास अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा.

Mangesh Mahale

Mumbai News : मराठा आरक्षण आणि मराठा समाजातील तरुण-तरुणींना जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

त्यातच मंत्री नितेश राणे यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर भाष्य करताना मराठा समाजाच्या तरुणांवर अन्याय होत असेल तर आपणही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा दिला आहे.

'मनोज जरांगेंच्या आधी मीच त्या अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करेन,’ असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले. मात्र, त्याचवेळी जरांगे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत वापरलेल्या भाषेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठा तरुणांवर अन्याय झाल्यास आक्रमक भूमिका

मराठा समाजाच्या प्रमाणपत्रासंदर्भात मनोज जरांगे पाटील काही मुद्दे मांडत आहेत, त्यात गैर काही नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. मीही मराठा समाजाचा आहे. मराठा समाजातील मुला-मुलींवर अन्याय होत असेल तर मीही पेटून उठणार,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मराठा समाजातील तरुणांचे नुकसान होत असेल, तर त्यांच्याविरोधात आपणही कारवाईची मागणी करू, असे राणे यांनी स्पष्ट केले. “अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मराठा समाजाच्या मुला-मुलींचे नुकसान होत असेल, तर मनोज जरांगेंच्या आधी मीच त्या लोकांचा कार्यक्रम करेन,” असा इशाराच त्यांनी दिला.

‘जरांगेंच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन’

मराठा समाजाच्या हितासाठी जरांगे पाटील भूमिका घेत असतील, तर त्या मुद्द्यावर आपलीही भूमिका स्पष्ट आहे, असे राणे यांनी सांगितले. समाजातील विद्यार्थ्यांवर किंवा तरुणांवर अन्याय होत असल्याचे समोर आल्यास जरांगे यांच्या खांद्याला खांदा लावून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात भूमिका घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले, मात्र, आंदोलन करताना राजकीय नेत्यांविरोधात वापरल्या जाणाऱ्या भाषेवरही राणे यांनी आक्षेप घेतला.

सडक्या आंब्यांना आम्हीही सोडणार नाही’

मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेचा संदर्भ देत नितेश राणे यांनी जरांगे यांना भाषेचा विचार करण्याचे आवाहन केले. ‘काही सडके आंबे असतील तर त्यांना आम्हीही सोडणार नाही,’ असे राणे म्हणाले. मात्र, भाजपच्या प्रमुख नेत्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राणे यांनी म्हटले की, “मनोज जरांगे भांडत आहेत, भूमिका घेत आहेत, ते समाजहिताचे आहे. मात्र भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या संदर्भात ज्या पद्धतीची भाषा वापरली जात आहे, ती चुकीची आहे.”

त्यामुळे मराठा समाजाच्या प्रश्नावर आपली भूमिका कायम ठेवताना राजकीय नेत्यांवरील टीका करताना भाषेचे भान ठेवावे, असे आवाहन राणे यांनी केले.

जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. ८ ऑगस्टपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून, सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

यानंतर जरांगे पाटील यांनी पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात दौरा केला. हा दौरा पूर्ण करून ते सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या दौऱ्यात मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्राशी संबंधित प्रश्न, कुणबी प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर टीका केली.

जरांगे यांनी बावनकुळे यांच्या नावाचा संदर्भ देत सरकारमधील नेत्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या वक्तव्यामध्ये बावनकुळे यांच्या दिसण्यावरूनही टीका करण्यात आली. **या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेवरच नितेश राणे यांनी आक्षेप घेत भाषेचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जरांगे आक्रमक झाले आहेत.

दुसरीकडे, मराठा समाजाच्या तरुणांवर अन्याय होत असल्यास आपणही त्यांच्या बाजूने उभे राहू, अशी भूमिका नितेश राणे यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

एकीकडे मराठा समाजाच्या प्रश्नांवर समान भूमिका घेण्याची तयारी आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांवरील टीकेच्या भाषेवर आक्षेप, अशी दुहेरी भूमिका नितेश राणे यांच्या वक्तव्यातून समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT