Aaditya Thackeray, Eknath Shinde
Aaditya Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray News: मुख्यमंत्री शिंदेंच्या दावोस दौऱ्यात दिवसाचा खर्च दहा कोटी; आदित्य ठाकरेंचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

Aaditya Thackeray On CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच दावोस दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी राज्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचे करार करण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरुन राजकारण तापलं आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर काँग्रेसकडून आणि आता ठाकरे गटाकडून शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरुन टीका केली होती.

आता माजी मंत्री व ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यातील (Davos Visit) प्रत्येक दिवसाचा खर्च दहा कोटी रुपये झाल्याचा गंभीर आऱोप केला आहे.

आदित्य ठाकरेंनी मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे.

ठाकरे म्हणाले, दावोस येथील महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता, हा कार्यक्रम एकंदर चार दिवसांचा असेल असं आम्हाला वाटतं. कारण १६ ते २० जानेवारी असा हा कार्यक्रम ठरवला होता. दावोस दौऱ्यात महाराष्ट्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक आणली गेल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.

मात्र, या दौऱ्यासाठी आम्हाला कळालेला अंदाजित खर्च साधारणपणे ३५ ते ४० कोटींच्या घरात आहे. चार दिवसांसाठी ४० कोटी खर्च केले. यामध्ये आणखी नवीन खर्च वाढू शकतो, तिकडे मित्रपरिवार गेला होता? तिथे कोणत्या गाड्या वापरल्या? याचा तपशील समोर येणं आवश्यक आहे असंही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौऱ्यातील प्रत्येक दिवसाचा खर्च हा साडेसात ते दहा कोटी रुपये होता. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाताना घटनाबाह्य चार्टर्ड विमानाचा वापर केला. यावर दोन ते अडीच कोटी खर्च झाला असेल. हा सर्व खर्च राज्यावर आला असेल. माझा चार्टर्ड विमानाला विरोध नाही. पण तुम्ही कमर्शिअल विमानाऐवजी चार्टर्ड विमानाचा वापर लवकर पोहोचण्यासाठी करता. पण शिंदे दावोसला उशिरा दाखल झाले.

त्यांनी दावोसमध्ये मोठं पॅव्हेलियन घेतलं असेल. पण सरकारमध्ये खर्च कसा दाखवायचा हे त्यांना चांगलं माहीत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा हा दौरा हास्यास्पद होता अशी टीकाही ठाकरेंनी केली आहे.

...त्यावर ४० कोटी खर्चण्याची गरज काय होती ?

देशातील महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रीच लेट पोहचतात, मग दुसऱ्या दिवशी दोन-तीन जणांना ते कोणाचे माणूस आहेत ते सांगतात आणि संध्याकाळी झपाट्याने परत येतात. हेच सांगायचं होतं तर ज्या ३३ देशांनी तुमच्या गद्दारीची दखल घेतली त्यांना इमेल करु शकला असतात. त्यावर ४० कोटी खर्चण्याची गरज काय होती असा खोचक सवालही ठाकरेंनी यावेळी केला.

मुख्यमंत्री शिंदे हे दावोसला मित्रपरिवारासोबत गेले होते का?

मुख्यमंत्र्यांचा दावोस दौऱ्याचा १६ जानेवारीला पहिला दिवस होता. यादिवशी अनेक बैठका आणि उद्योजकांच्या भेटीगाठी होणार होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री सकाळी लवकर तिथे पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते सायंकाळी साडेचार-पाच वाजण्याच्या सुमारास पोहोचले. एकनाथ शिंदेंनी सायंकाळी साडेसहा-सात वाजता उद्घाटन केलं. त्यामुळे आधीच्या नियोजित बैठका रद्द झाल्या. त्यांच्या बैठकीचे फोटो किंवा इतर पुरावे आम्हाला कुठेही दिसले नाहीत.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत अधिकृत कोण होतं आणि अनधिकृत कोण होतं? मित्रपरिवारासोबत गेला होता का? ते कुठे राहिले? त्यांचा खर्च कोणी केला? त्यांच्या गाड्यांचा खर्च कोणी केला? याची माहिती समोर येणं गरजेचं असल्याचंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT