Shiv Sena's Rebel MLAs in Guwahati
Shiv Sena's Rebel MLAs in Guwahati Sarkarnama
मुंबई

गुवाहाटीत घुमला शिवसेनेचा आवाज; 42 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आतापर्यंत नेमके किती आमदार आहेत, याबाबत अनेक चर्चा होत्या. अखेर शिंदे यांनीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. या शक्तीप्रदर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यामध्ये एकूण 42 आमदार दिसत असून त्यामध्ये 35 आमदार शिवसेनेचे आहेत. (Eknath Shinde Latest News)

गुवाहाटीतील हॉटेलमध्ये सर्व बंडखोर आमदार थांबले आहेत. आज दुपारी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदारांचे फोटोसेशन झाले. तसेच याचे व्हिडीओ तयार करून व्हायरल करण्यात आले आहेत. हे सर्व आमदार शिवसेनेचा जयजयकार करत असल्याचे दिसतात. तसेच बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचाही जयघोष झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

दरम्यान, शिंदे यांच्यासोबत सध्या 42 आमदार असल्याचे दिसते. त्यामध्ये सात अपक्ष आमदार असून उर्वरित 35 शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे शिंदे यांना पक्षावर किंवा गटनेते पदावर दावा सांगण्यासाठी, सर्व आमदारांचं पद वाचवण्यासाठी आणखी दोन आमदारांची गरज असल्याचे दिसते. पण अजूनही काही आमदार गुवाहाटीत पोहचणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या बंडानं पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांच्याकडील आमदारांची संख्या सध्यातरी 18 वर थांबली आहे. दोन आमदार त्यांच्या संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या मुंबईत असलेल्या आमदारांमध्ये दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.

ठाकरे यांच्याकडील संख्याबळ दिवसागणिक कमी होत चालली आहे. त्यांच्याकडे आता मोजकेच शिलेदार उरले आहेत. त्यामध्ये आदित्य ठाकरे आणि उदय सामंत हे दोनच मंत्री आहेत. सुनील प्रभू, अजय चौधरी, भास्कर जाधव, नितीन देशमुख, कैलास पाटील, रविंद्र वायकर, सुनिल राऊत, वैभव नाईक, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, सुजित मिंचेकर, राजन साळवी व रमेश कोरगांवकर, संजय बांगर या आमदारांचा समावेश आहे.

ठाकरे यांच्याकडे उरलेल्या पंधरा आमदारांपैकी आता कोणी शिंदे यांच्याकडे जाणार नाही, अशी आशा ठाकरेंना आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे. शिंदे गटात गेलेल्या इतर आमदारांना परत आणण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी टाकल्याचे समजते. त्यामुळे किती बंडखोर आमदार ठाकरेंच्या गळाला पुन्हा लागणार, याबाबत उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT