Eknath Shinde at Guvahati
Eknath Shinde at Guvahati Sarkarnama
मुंबई

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले ४० आमदार; पण चर्चा 'त्या' १६ जणांचीच का?

सरकारनामा ब्यूरो

Final Decision on Shiv sena Case : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यावळी सुरुवातीला बंडखोर आमदारांच्या गटात शिंदे यांच्यासह १६ आमदार सहभागी होते. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने १६ आमदारांना शिवसेनेने नोटीस बजावून ४८ तासांत उत्तर द्यावे, अन्यथा अपात्र ठरविण्याचा इशाराही नोटीसमध्ये दिला. त्यानंतर या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर एक-एक असे शिवसेनेतील ४० आमदार शिंदे यांना जाऊन मिळाले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर​ यांनी सुरुवातीस बंड केले होते. त्यानंतर त्यांना इतर आमदार जाऊन मिळाले.

दरम्यान, सुरवातीला बंड केलेल्या १६ आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस बजावली होती. तर या आमदारांना अपात्र ठरविण्याची याचिका उद्धव ठाकरेंच्या वतीने दाखल करण्यात आली होती.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी संबंधित १६ जणांना नोटीस बजावली. त्या नोटीसविरोधात १६ जण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यातच भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या पाठिंब्यावर अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष झाल्याने सत्तासंघर्षातील पेच वाढला. दरम्यान, बंडखोर गटाने शिवसेनेवर दावा ठोकला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते समर्थक आमदारांसह सूरतहून गुवाहटीला दाखल झाले. त्यावेळी शिवसेनेने एकनाथ शिंदेंना कारवाईचा इशारा दिला होता. शिवसेनेने अजय चौधरी यांची गटनेतेपदी, तर सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची प्रतोदपदी नियुक्ती केली. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातर्फे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली.

दरम्यान, संख्याबळाअभावी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असेलेल्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी (ता. ११) होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे झालेली आहे. त्यात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे. दरम्यान, १५ मे रोजी न्यायमूर्ती एम. आर. शहा निवृत्त होत आहेत, तसेच २० मे ते २ जुलै अशी सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुटी असणार आहे. त्यामुळे हा निकाल गुरुवारी देण्यात येणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT