Amol Mitkari|NCP|
Amol Mitkari|NCP|  Sarkarnama
मुंबई

Amol Mitkari : '50 खोके, एकदम ओके'चा घाव त्यांच्या वर्मी लागला म्हणून...

सरकारनामा ब्युरो

Amol Mitkari : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आज विरोधक आंदोलन करत असताना सत्ताधारी आमदार तेथे आले. त्यातून झालेल्या धक्काबुक्की व शिवीगाळी सारखे प्रकार घडले. या घटनेचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली.

अमोल मिटकरी म्हणाले, काल सायंकाळी महाविकास आघाडीची बैठक झाली. यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र राहण्याचे निर्देश आम्हाला देण्यात आले होते. त्यानुसार आम्ही महाविकास आघाडीचे आमदार एकत्र जमलो. वेगळाच मुद्दा उकरून काढायचा आणि विधीमंडळाच्या अधिवेशनाचे दोन दिवस राहिलेले असताना आपली दादागिरी दाखवायची, असे प्रकार सत्ताधारी आमदार करत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, भरत गोगावले व त्यांच्या भागातील आमदारांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. आम्ही शांतपणे त्यांना उत्तर दिले. विरोधकांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही. हे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करत होतो. 50 खोके एकदम ओके म्हंटले की, त्यांच्या वर्मावर घाव बसला. त्यामुळे ते चिडले. आणि त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हा शोभणारा विषय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काही नवीन आमदार असतात ते काही मुद्दे मांडू पाहतात. त्यावेळी दादागिरीची भाषा करणे योग्य नाही. तो कोण आमदार होते हे मी ओळखतही नाही. त्यांच्याकडून पत्रकारांसमोर धक्काबुक्की होत होती. मी म्हणालो पत्रकार आहेत. आपण जरा मागे येऊन बोलू यात. ते अचानक चिडले. त्यांनी आई-बहिणीवरून शिव्या देण्याचा प्रयत्न केला. आम्ही विधीमंडळात गेलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांना समज द्या अशी विनंती केली.

शशिकांत शिंदे, रोहित पवारांना व मला धक्काबुक्की केली. गोगावले म्हणत आहेत ते सर्व खोटे आहे. 50 खोके एकदम ओके हा घाव त्यांच्या वर्मी लागला. गोगावले हेच पूर्वी शिवाजी महाराजांच्या समाधीवर चढले होते. ते नेहमीच वादग्रस्त विधान करतात. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी पण विरोधीपक्षही तेवढाच महत्त्वाचा आहे. ते दादागिरीची भाषा वापरून महाराष्ट्रात विरोधीपक्ष संपवायचा आहे काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्यांना आम्हाला मारून टाकायचे आहे काय? आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत. पोळा जवळ आला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. शेतीपीक नुकसानीचा अजूनही सर्व्हे झालेला नाही. काल विधानभवनासमोर एका शेतकऱ्याने आत्महत्त्येचा प्रयत्न केला. हे मुद्दे मांडायचे नाहीत का? आम्ही गरिबाच्या घरात जन्माला आलो म्हणून आम्हाला हातपाय नाहीत काय? पावसाळी अधिवेशन हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असते. राज्याचे एकच मंत्री चार खात्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT