congress
congress 
मुंबई

काँग्रेसच्या ''शेतकरी बचाव रॅलीत'' 50 लाख शेतकऱ्यांचा सहभाग

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरी विधेयकांच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी (ता. 15) आयोजित केलेल्या शेतकरी बचाव व्हर्चुअल रॅलीत 10 हजार गावांमधील 50 लाख शेतकरी सहभागी होणार आहेत. राज्यातील सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते एकाच वेळी त्यांच्याशी संवाद साधतील. 

केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी आणि कामगार कायदे आणून शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी, कामगार उद्धवस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यानिमित्ताने केली आहे. 

संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,  गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, वामशी चंद रेड्डी, आशिष दुआ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहतील. 

दुसरा कार्यक्रम कोल्हापूर येथे होणार असून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम तेथे उपस्थित असतील. औरंगाबाद येथील कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील उपस्थित असतील.

तर अमरावती येथील शेतकरी बचाव रॅली, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होईल. नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत ,पुनवर्सन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत रॅली होईल. कोकण विभागातील रॅली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली होईल. 

उद्या दुपारी चार वाजता ही व्हर्चुअल रॅली होईल. शेतकऱ्यांशी संवाद साधणारे काँग्रेस नेतेही एकमेकांशी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जोडलेले असतील. राज्यातील १० हजारांहून जास्त गावांमध्ये एलईडी स्क्रीन, प्रोजेक्टर, स्क्रीन,  टीव्ही, लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून या व्हर्च्युअल सभांचे प्रक्षेपण केले जाईल.

महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेस कमिटीच्या   facebook.com/incmaharashtra , twitter.com/incmaharashtra ,  youtube.com/incmaharashtra या फेसबुक, ट्वीटर, युट्युब माध्यमातून या शेतकरी बचाओ मेळाव्याचे थेट प्रक्षेपण  करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT