Jitendra Awhad Sarkarnama
१९९३ साली संध्याकाळी ७ वाजता गोपिनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. पण त्याच रात्री शरद पवार यांनी मुंडेची सुरक्षा वाढविली होती. आजच्या आंदोलनांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच आजही आपण आणि सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांचे कोणतेही नुकसान होवू नये हीच आपली भूमिका आहे. - मंत्री जितेंद्र आव्हाड
हा हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अपमान. महाराष्ट्रात राजकीय मतभेद होते पण मनभेद नव्हते. मागच्या ५० वर्षांपासून शरद पवार यांनीच एसटी कामगारांचे नेतृत्व केले आहे. पण एखादे आंदोलनाचे नेतृत्व एखाद्या चुकीच्या हातात गेले की काय होते याच उत्तम उदाहरण आहे. - मंत्री जितेंद्र आव्हाड
मंत्री अशोक चव्हाण यांनी कष्टकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही त्यांनी मदत केली नाही. तुम्ही मराठा समाजाला मदत करता मग एसटी कर्मचारी आणि कष्टकऱ्यांना मदत का नाही? तुम्ही चर्चेला बोलावलं म्हणता, पण बोलावलं की नाही हा तपासाचा मुद्दा - गुणरत्न सदावर्ते
आज आदरणीय पवार साहेबांच्या सिल्वर ओकवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि याचा मूळ सूत्रधार गुणरत्न सदावर्ते हाच आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते उघडपणे या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. पोलिसांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रथम गुणरत्न सदावर्ते यांना अटक करावी अन्यथा उद्या सदावर्ते यांच्या घरावर काही हल्ला झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे
काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगड घेऊन आले. आयुष्र घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. पवार साहेब आता तरी संन्यास घ्या, गप्प घरी बसा - भाजप नेते निलेश राणे
एसटी कर्मचाऱ्यांना विनंती करतो आहे. गेली कित्येक महिने आपण संपावर आहात. आपल्या जवळपास सर्व मागण्या मंजूर केल्या आहेत. हायकोर्टाने प्रत्येकवेळा तुम्हाला सांगितलं, काही मार्ग सुचवला, एवढं सगळं झाल्यानंतरही पवार साहेबांच्या घराबाहेर जाण्याचा काही कारण नव्हतं. एवढ्या सगळ्या लोकांना कायम करणं शक्य नव्हतं, हे हायकोर्टाने नेमलेल्या समितीने सांगितलेलं होत, ते कामगारांना ही मान्य होतं. एवढा पगार दिला तर विकास कामांना एक रुपयाही शिल्लक राहणार नाही. तरीही पैसे वाढवून दिले. मात्र तरीही आशा प्रकारे पवार साहेबांच्या घरावर जाणं निंदनीय आहे. यांचे बोलविते धनी हे वेगळे असण्याची शक्यता - राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ
सटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. अशा पद्धतीने घरावर दगड आणि चप्पल फेक करून आंदोलन करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. - भाजप नेत्या पंकजा मुंडे
अखेर संयम सुटला... घटना दुदैर्वीच पण गेल्या ४ महिन्यापासून एसटी कामगारांचा संप सुरू. कामगारांच्या न्यायहक्कासाठी भाजपानंही आंदोलनाला पाठिंबा दिला. राजकारणासाठी सरकारने कामगारांच्या संपाकडे दुर्लक्ष केले. अनेक आत्महत्या झाल्या. कुटुंब रस्त्यावर आली. आज या बांधवांचा संयम सुटलाच - भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे शरद पवार यांच्या भेटील पोहचले.
बारवाले, बिल्डर यांच्या प्रमाणे कधी कधी एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनाही समजून घ्या पवार साहेब... : भाजप आमदार अतुल भातखळकर
पोलिसांकडून आझाद मैदान सील. आझाद मैदानात कोणालाही प्रवेश नाही.
आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. काल मा. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ? आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते. महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवार साहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून, आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. - जलसंपदा मंत्री जयंत पाटील
न्यायालयासमोर या आंदोलनाचा तपशील ठेवायचा का हे तज्ज्ञांशी चर्चा करून ठरवू. कायदा असला तरीही सहानुभूती म्हणून आम्ही आझाद मैदानात परवानगी दिली. न्यायालयाने विलीनीकरण शक्य नाही हे सांगून देखील आंदोलन करणे चुकीचे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही हे जाणून बुजून दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात त्रिपुरा वरून घडलेली घटना, मंदिर उघडी करण्याची घटना यावरून हे समोर येत आहे. पोलीस अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या भाषणाची चौकशी करतील. कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
एस. टी. कामगारांच्या प्रश्नांच्या अडून काही राजकीय शक्ती हे घडवत आहेत. आमची आज क्राईम कॉन्फरन्स होती. सकाळपासून याच्यात होतो. IB ला का कळले नाही याची माहिती घेऊ. महिला आंदोलक अधिक असल्याने पोलिसांना त्यांना अडवता आले नाही. मी स्वतः सुप्रिया ताई यांच्याशी बोललो आहे. आता सगळे कंट्रोलमध्ये आले आहे. काही अज्ञात शक्ती असे घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण आंदोलक होते, खरेच आंदोलक होते का हे तपासातून समोर येईलच. - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
अतिशय आणि अचानक झालेली दुर्दैवी घटना आहे. फेल्युअर कुठे झाले हे शोधून काढू. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे स्वागत केले आणि नंतर असा हल्ला केला गेला. एस टी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन करतो. कोणी भडकविण्याचे काम करत असेल तर कारवाई केली जाईल. - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
आंदोलनाच्या चौकशीचे आदेश, दोषींवर कडक कारवाई केली जाईल - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा.
शरद पवार यांच्या घरावर आक्रमक आंदोलकांनी केलेला हल्ला हा राज्याच्या गृह विभागाचे अपयश असल्याच्या चर्चा. पोलिसांना या हल्ल्याचा कोणताही सुगावा नव्हता का? राज्याच्या गुप्तवार्ता विभागाला देखील या हल्ल्याची कोणतीही कुणकुण नव्हती का? असा सवाल विचारला जात आहे. तसेच यावेळी केवळ २ ते ३ सुरक्षा रक्षक असल्याने शरद पवार यांच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मुंबई पोलिसांनी तातडीने येऊन माझे आई-वडिल आणि मुलांसाठी जे केले आहे, त्याबद्दल मुंबई पोलिसांचे जाहीपणे मनःपूर्वक आभार मानते. जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत मी पहिल्यांदाच अशी घटना पाहिली आहे. पण आमची हरकत नाही. माझी आंदोलकांसह सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, आमची सर्वांचीच चर्चेला बसायची तयारी आहे. आंदोलकांनी फक्त शांततेच्या मार्गाने घ्यावे. अशा मार्गाने प्रश्न सुटत नाहीत. आपण चर्चेला बसू शकतो. आम्ही अनेकवेळा याआधीही बसलेलो आहोत. आमची अजूनही चर्चेसाठी बसायची तयारी आहे. जे काही करायचे आहे, ते शांततेच्या मार्गाने करूयात. - खासदार सुप्रिया सुळे
अत्यंत दुर्देवी प्रकार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा सरकराने प्रयत्न केला. मात्र कोणती तरी एक अदृश्य शक्ती माथी भडकवण्याचे काम केले. ज्यांच्या पोटात आणि डोळ्यात महाविकास आघाडीचे सरकार खुपते त्यांचा या आंदोलनामागे हात. - खासदार संजय राऊत.
हे विषय सामोपचारे हाताळण्याची गरज होती. पण १२० लोकांच्या मृत्यूनंतही सरकारकडून कडक कारवाईचा बडगा उगारला त्यामुळे कर्मचारी हतबल झाले. त्यामुळे त्यांनी अंतिम मार्ग स्विकारला - विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
आंदोलक कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात.
यावेळी आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
दरम्यान या आंदोलनस्थळी अनेक उच्चपदस्थ पोलिस अधिकारी दाखल होत आहेत. मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.
यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी धाव घेत आक्रमक कर्मचाऱ्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. मी आपणाशी बोलायला तयार आहे, मात्र शांततेचा मार्ग अवलंबा असे आवाहन यावेळी सुळे यांनी केले. माझे आई-वडिल आणि मुलगी घरात आहे, मला त्यांची सुरक्षितता तपासु द्या मी तुमच्या सर्व मागण्या ऐकुन घेते असेही सुळे म्हणाल्या.
आपण केवळ विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. याशिवाय आपण कोणाच्याही सांगण्यावरुन इथे आलो नसल्याचे आंदोलनकांनी सांगितले आहे.
या आक्रमक कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी धाव घेत आंदोलन केले. पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन सुरु असून आंदोलकांनी निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक सुरु केली आहे. शेकडोंच्या संख्येने हे आंदोलक पवार यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले आहेत.
मुंबई : राज्यात चालू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) आंदोलन आता आणखी चिघळले आहे. उच्च न्यायालयाने (High Court) काल एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाची मागणी फेटाळत २२ एप्रिलपर्यंत त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांना निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युएटी अशा सुविधा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु या निर्णयावर कमालीचे नाराज होत आझाद मैदानात असलेले एसटी कर्मचारी आज आक्रमक झाले आहेत.