Mumbai News : लोकसभा निवडणुकीत मोदी-शहांच्या राजकारणाची 'विकेट' घेण्यासाठी 'इंडिया'ची टीम या महिनाअखेरीला मुंबईत दाखल होईल. या टीमचा आघाडीचा फलंदाज म्हणून कॉंग्रेस नेते राहुल गांधीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मुंबईत येणारे राहुल हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला खास 'मातोश्री' वर जाण्याची शक्यता आहे. या भेटीचे निमंत्रण धाडलेल्या 'मातोश्री'वर राहुल यांचा विशेष पाहुणचार केला जाणार असल्याचेही समजते. मात्र, राहुल गांधी (Rahul Gandhi) खरोखरीच 'मातोश्री'वर येणार का, तसे झाल्यास त्यावरून ठाकरेंना विरोधक काय बोलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाकरे सरकार कोसळले, शिवसेनेत बंड झाले, ठाकरेंचे ४० आमदार फुटले, उरल्यसुरल्या आमदारांची 'नाकाबंदी' होऊ लागल्याने ठाकरेंच्या राजकीय भवितव्यावर प्रश्न उभे केला जात आहेत. तरीही, नव्या दमाने ठाकरे पक्ष वाढविण्यासाठी हालचाली करीत आहेत. त्यात, आधीच्या महाविकास आघाडीतून ठाकरेंना कॉंग्रेसचे बळ मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणजे ठाकरे आणि गांधी घराण्यातील राजकीय 'दुश्मनी' संपून, घरोबा होत असल्याचे पाहायला मिळाला आहे.
काही महिन्यांपूर्वी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन कॉंग्रेसच्या (Congress) माजी अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. त्यापाठोपाठ विरोधकांच्या (नव्या इंडिया आघाडीच्या) बैठकांत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील जवळीक वाढली. अलीकडच्या काळात हे दोघे अनेकदा फोनवरून चर्चा करीत असल्याचेही ऐकिवात आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी तर राहुल गांधी 'मातोश्री'वर येणार असल्याची चर्चा पसरली होती. त्यात तेव्हा तथ्य नसले; तरीही राहुल गांधी हे 'मातोश्री'वर येणार असल्याच्या चर्चेनेच शिंदे-फडणवीसांना मळमळ झाल्याचेही दिसून आले. मात्र, तेव्हा राहुल मातोश्रीवर आले नाहीत.
मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणऱ्या 'इंडिया'च्या बैठकीला देशभरातील विरोधी नेते येणार असून, त्यात कॉंग्रेसकडून राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकाजूर्न खर्गे उपस्थित असतील. या बैठकीच्या आदल्या दिवशी, ही मंडळी ठाकरेंकडे जेवण करणार आहेत. हा कर्यक्रम आणि बैठक हयात हॉटेलमध्ये होणार असली; तरीही राहुल गांधी हे 'मातोश्री'वर जाऊन ठाकरेंची भेट घेणार असल्याचे समजते. या संभाव्य भेटीला दुजोरा मिळत नसला; तरी विरोधकांना धक्का देण्याच्या उद्देशाने राहुल गांधी 'मातोश्री'वर जाऊ शकतात. राहुल गांधींनी 'मातोश्री'वर पाय ठेवल्यानंतर नव्या आरोप-प्रत्यारोपांचे युध्द रंगू शकते.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.