Ahmednagar Ncp News : कर्नाटकच्या विजयानंतर विरोधी पक्षांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईमध्ये काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), ज्येष्ट नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, खासदार सुनील तटकरे, श्रीनिवास पाटील उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर, अहमदनगर, माढा, सातारा, परभणी, बीड, उस्मानाबाद, नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पक्षबांधणीच्या दृष्टीने पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना कोण टक्कर देणार? अशी चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) सहा नावे पुढे आली आहेत. यामध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर, घनःश्याम शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. मुंबईमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
या वेळी अहमदनगरची नेतेमंडळी उपस्थित होती. बैठकीला राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राहुल जगताप, चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर आणि राजेंद्र कोठारी हे प्रमुख नेते उपस्थित होते. या वेळी विधानसभा मतदारसंघचाही आढावा घेण्यात आला. त्यामध्ये काही नावांचीही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच लवकरात लवकर पक्षाने लोकसभेचा उमेदवार ठरवावा, अशी मागणी नेत्यांनी केली.
दरम्यान, अहमदनगरमधून लंके हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ते खासदार विखे यांना थेट आव्हान देत असतात. शिवाय जिल्ह्याच्या राजकाणात लंकेंचे आकर्षण असल्याचेही सांगितेल जाते. मात्र, आता राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्याही वाढली आहे. यामुळे आगामी काळात उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.