Mumbai News : महायुती सरकार सत्तेत परत आलं आहे. पण मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी वगळता उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी पुढील 24 तासांत होण्याची दाट शक्यता आहे. याच धर्तीवर महायुतीतील भाजपा, एकनाथ शिंदे शिवसेना,अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना किती आणि कुठलं खातं मिळणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
या तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण अशातच आता युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (ता.13) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईतील रस्ता घोटाळ्यावर बोट ठेवले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadnavis) यांना स्वच्छ सरकार चालवण्याची मोठी संधी आहे. त्यांनी एकनाथ शिंदे,दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा, अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकेर) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. तसेच आदित्य ठाकरेंनीही विधानभवन परिसरात फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. यातच आता आदित्य ठाकरेंनी मुंबईतील रस्ता घोटाळ्यावरुन एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून आपण मुंबईतील रस्ते घोटाळ्यासंदर्भात आवाज उठवत आहोत. जवळपास 6 हजार कोटींचा घोटाळा लोकांसमोर आणला होता.पण मुंबई महापालिकेनं देखील मान्य करावं लागलं आणि 6 हजार कोटींवरून 5 कोटींवर आला.
या घोटाळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी मंत्री दीपक केसरकर,मंगलप्रभात लोढा यांचा त्यामध्ये सहभाग आहे का? हे मला माहिती नाही. केसरकर, लोढा यांचा यात काही हात आहे का? याचं उत्तर सरकारकडून आलेलं नाही,असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
तसेच मुंबईतील रस्ता घोटाळ्यात एसआयटी चौकशी लावावी अशी मागणी आता भाजपकडून होत आहे. खोके सरकारच्या रस्ते घोटाळ्याची चौकशी करा, हेच मीही गेल्या दोन वर्षांपासून सांगत होतो. आपण हे घोटाळे लोकांसमोर आणले, त्यानंतर आता मुंबईतील भाजपा बोलायला लागली, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची संधी आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना रस्ता घोटाळ्याची एसआयटी चौकशी होईपर्यंत आणि त्यांचा या रस्ते घोटाळ्यात काहीही संबंध नाही हे सिद्ध होत नाही,तोपर्यंत या तिघांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवावं. तेव्हाच हे सरकार वॉशिंग मशीनचं सरकार नसल्याचं समजू,असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली स्थगितीवर प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, ही स्थगिती घाईने दिलेली आहे. यावरून भाजपचं हिंदुत्व हे नकली असल्याचं व निवडणुकीपुरतंच असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीवेळी हिंदुंना पुढे केलं जातं. पण निवडणुका झाल्या की, हिंदूच सुरक्षित नसतात,अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.