Abhishek Ghosalkar Case Update  Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar: वो कौन था? अभिषेक, मॉरिसच्या मृत्यूचे गूढ कायम...

Abhishek Ghosalkar Firing Case: दिवे गेले होते, माळ्यावर कोणी होता का?

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai: माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि त्याची हत्या करणारा मॉरिस नाेराेन्हा यांच्या हत्येचे गूढ अजूनही कायम आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्येनंतर तीन दिवस होऊनही अद्याप तपासातून काही ठोस कारण बाहेर येताना दिसत नाही. ज्या खोलीत फेसबुक लाइव्ह झाले होते, त्याला एक माळा होता आणि या तिथे आधीच कोणी व्यक्ती उपस्थित होता का, असा सवाल केला जात आहे.

मॉरिस हा निर्ढावलेला गुंड होता. त्याने अभिषेकची हत्या केल्यानंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली असली तरी तो इतके टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता फार कमी वाटते. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार कोणीच पाहिलेला नसून मॉरिसचा मृतदेह माळ्यावर सापडला आहे. याशिवाय या प्रकरणावेळी रस्त्यावरचे दिवे गेले होते. शिवाय गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर अभिषेकचे कार्यकर्ते आत खोलीत गेले आणि त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, खोलीत त्यावेळी काय झाले होते, याचा कोणालाच पत्ता नव्हता. मॉरिससुद्धा मृत झालाय, हे अभिषेकच्या हत्येनंतर काही वेळाने समजले. या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

घोसाळकर आणि नोरोन्हा गुरुवारी संध्याकाळी एकत्र फेसबुक लाइव्ह करत होते. लाइव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्यानं पिस्तूल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरून अभिषेकवर गोळीबार केला. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मॉरिस हा दहिसर-बोरिवली परिसरात राहतो. या भागात तो मॉरिसभाई म्हणून परिचित होता. त्याने अनेकवेळा परदेश दौराही केला आहे. नुकतंच तो अमेरिकेतील लॉस एंजल्सवरून आला होता. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी त्याने महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ज्या भागाचं नेतृत्व अभिषेक घोसाळकर करतात, त्याच भागातून मॉरिस निवडणुकीची तयारी करत होता. मात्र, अभिषेक त्याला विरोधक वाटत होता.

दीड वर्षापूर्वी अभिषेक आणि मॉरिसचं कडाक्याचं भांडण झालं होतं. मॉरिसवर बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. त्या प्रकरणात मॉरिसला 5 महिने तुरुंगात जावं लागलं होते. मात्र, बलात्कारासारख्या खटल्यात अभिषेकने अडकवल्याचा राग मॉरिसच्या मनात होता. त्याचा बदला घेण्याची भावना नेहमीच त्याच्या मनात होती, हे मॉरिसच्या पत्नीच्या जबाबावरून सिद्ध होतंय. मॉरिस नेहमी अभिषेक घोसाळकरांना सोडणार नाही हेच घरात बोलत असायचा, असा जबाब मॉरिसच्या पत्नीने पोलिसांना दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभिषेकवर समोरून पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, शवविच्छेदन अहवालात घोसाळकरांना चार गोळ्या लागल्याचं म्हटलं आहे. एक गोळी खोलीतील काचेला लागली होती. अभिषेकवर गोळ्या झाडल्याचं सांगितलं जातं. मात्र, फेसबुक लाइव्हमध्ये कॅमेऱ्याच्या मागून गोळ्या झाडणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेले नाही. मॉरिसला अभिषेकवर सूड उगवायचा होता, मग त्याने स्वत:ही आत्महत्या का केली? हा एकूणच प्रकार संशयास्पद असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा केले आहे आणि यासंबंधीची त्यांची पोलिस अधिकारी यांच्यासोबत चर्चासुद्धा झाली आहे. अभिषेक हत्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये मॉरिसचा पीए मेहुल पारिख, रोहित साहू आणि मॉरिसचा अंगरक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्राचा समावेश आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT