<div class="paragraphs"><p>Kangana Ranaut</p></div>

Kangana Ranaut

 

Sarkarnama

मुंबई

कंगना राणावत पोचली थेट पोलीस ठाण्यात !

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) वादात सापडली होती. यानंतर तिने शिखांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ती अडचणीत आली आहे. या प्रकरणी तिच्यावर दाखल गुन्ह्यात मुंबई पोलिसांसमोर (Mumbai Police) चौकशीसाठी कंगना आज हजर झाली.

कंगना आज सकाळी 11 वाजता खार पोलीस ठाण्यात हजर झाली. मागील महिन्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंगनासोबत तिचे वकील रिझवान सिद्दीकी हे होते. पोलिसांनी या महिन्याच्या सुरवातीला कंगनाला चौकशीसाठी समन्स बजावले होते. कंगनाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. कंगनाने तपासात सहकार्य केल्यास तिला अटक करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली होती. यानंतर ती आज मुंबई पोलिसांसमोर हजर झाली.

दरम्यान, कंगनावर दाखल हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी तिच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली होती. माझी सोशल मीडिया पोस्ट ही बंदी घातलेल्या संघटनेबद्दल होती. राज्यघटनेनुसार मला भाषण स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार मिळाला आहे. यानुसार ही पोस्ट होती, असे तिने म्हटले होते. यावर सरकारी वकिलांनी कंगनाला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, असे सांगितले होते. अद्याप तिला अटक करण्याचा मुद्दा उपस्थित झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले होते. कंगनाला तपासात सहकार्य केल्यास तिला अटक करणार नाही, अशी हमीही त्यांनी न्यायालयाला दिली होती.

यावर उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आणि कंगनाचे म्हणणे नोंदवून घेतले. कंगना मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी 22 डिसेंबरला हजर राहील, असे तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. याआधी कंगनाही मुंबई पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. आता पुन्हा तिचा चौकशीचा फेरा सुरू होणार आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरुन तिच्यावर देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

शिखांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईत कंगनाविरोधात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने ही तक्रार दिली आहे. याचबरोबर शिरोमणी अकाली दलानेही कंगनाच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला खलिस्ताना ठरवून शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी दहशतवादी असा कंगनाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT